इन्शुरन्स कंपनीला तब्बल चार लाख ६२ हजार रुपयांचा गंडा: पाच जणांना अटक

औरंगाबाद ,१८ मे /प्रतिनिधी :-कोरोनाबाधित नसताना पॉलिसी उकळण्यासाठी मनपाच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उपचार घेतल्याचे भासवून बनावट डिस्चार्ज कार्ड बनवून कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला तब्बल चार लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी पाच जणांना बुधवारी दि.१८ पहाटे अटक केली. आरोपींना गुरुवारपर्यंत दि.१९ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले.

शुभांगी भरतसिंग राजपुत (२३, रा. नारळीबाग), गणेश काकासाहेब कडू (२३), इंदल भाऊसिंग राजपुत (५३, रा. दोघे रा. गिरीराज कॉलनी, पंढरपुर, तिसगाव), प्रविण प्रभाकर पवार (२८, रा. देऊळगाव राजा, बुलढाणा) आणि दिपक दत्तात्रय निंबाळकर (२८, रा. कल्याण सिटी, एएस क्लब) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात कोटक जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जहीर खान अजगर खान (४१, रा. मालाड ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपींसह एकूण दहा जणांवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अटक आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना अटक करायची आहे. आरोपींनी मिल्‍ट्रॉन येथील खोटे डिस्चार्ज बनवून इन्‍शुरन्‍स कंपनीला गंडा घालून घेतलेली रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपींनी गुन्‍हा करण्‍यासाठी ज्या संगणक, लॅपटॉप, प्रिन्‍टर आणि इतर साधन सामृग्रीचा वापर केला ते जप्‍त करायचे आहे. आरोपींनी बनवाट डिस्‍चार्ज कोठे तयार केले, त्‍यांना कोणी मदत केली याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.