महागाईचा भडका, ९ वर्षांतील सर्वोच्च पातळी

  • घाऊक महागाई दर १५.०८ टक्क्यांवर
  • इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर ३८.६६ टक्के
  • अन्नधान्य महागाई दर ८.८८ टक्क्यांवर

नवी दिल्ली ,१७ मे /प्रतिनिधी :- देशात महागाईचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य नागरिक अक्षरश: होरपळून जात आहेत. किरकोळ महागाई दर ८ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाईनेही नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात १५.०८ टक्के होता. एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल २०२१ मध्ये घाऊक महागाईचा दर १०.७४ टक्के होता. या वाढीसह घाऊक महागाई दर नऊ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर ३४. ५२ टक्क्यांवरुन ३८.६६ टक्के तर अन्न-धान्य महागाई दर ८.७१ टक्क्यांवरुन ८.८८ टक्के झाला आहे.

‘डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’ ने मंगळवारी १७ एप्रिल रोजी महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. डीपीआयआयटीने सांगितले की, तेल आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमध्ये घाऊक महागाई वाढली आहे. एप्रिलमध्ये घाऊक किमतींवर आधारित चलनवाढ १५.५ टक्क्यांच्या आसपास असू शकते, असे भाकित विश्लेषकांनी केले होते. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल हा सलग तेरावा महिना आहे, ज्यात घाऊक महागाईचा दर १० टक्क्यांच्या वर आहे. यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर १४.५५टक्के होता.

डीपीआयआयटीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘खनिज तेले, मूलभूत धातू, कच्चे तेल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, उपभोग्य वस्तू, अ – खाद्य वस्तू, अन्न उत्पादने आणि रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाईचा दर उच्च स्तरावर पोहोचला आहे. या सर्व वस्तूंच्या किमती गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत लक्षणीय वाढल्या आहेत’.

आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ८.३५ टक्के होता, जो मार्चमध्ये ८.०६ टक्के होता. त्याचप्रमाणे, इंधन आणि वीज बास्केटमधील घाऊक महागाईचा दर मार्चमधील ३४.५२ टक्क्यांच्या तुलनेत ३८.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत महागाईचा दर किंचित वाढला आहे. मार्चमध्ये तो १०.७१ टक्के होता, जो एप्रिलमध्ये १०. ८५ टक्के झाला.

भारताचा घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर

भारतात किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईच्या दरानेही मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानुसार, घाऊक महागाईचा दर एप्रिमध्ये १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (ड्ब्ल्यूपीआय) १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात हा सुधारित दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता. दरम्यान, एप्रिल २०२१ पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाईने उच्चांक गाठला होता. खनिज तेल, धातू, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस, खाद्य पदार्थ आणि रासायनिक पदार्थ आदींच्या किंमतीत वाढ झाल्यानं प्राथमिकदृष्ट्या महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती, सरकारने आपल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्य पदार्थ्यांमध्ये ८.३५ टक्के वाढ झाली होती. त्याआधीच्या महिन्यात हा दर ८.०६ टक्क्यांवर होता. दर महिन्याला होणाऱ्या महागाईच्या वाढीमुळं पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. एप्रिल महिन्यात भाज्यांचे दर २३.२४ टक्क्यांवर होते. तत्पूर्वी मार्चमध्ये हा दर १९.८८ टक्क्यांवर होता. तर बटाट्यांचा महागाई दर १९.८४ टक्के तर कांद्याच्या दरात ४.०२ टक्क्यांनी घट झाली होती. तर फळ्यांच्या दरात १०.८९ टक्के वाढ झाली जी गेल्या महिन्यात १०.६२ टक्के होती. तसेच गव्हाचे दर १४.०४ टक्क्यांवरुन १०.७० टक्क्यांवर आले आहेत. तसेच अंडी, मटण आणि मासे यांच्या दरात मार्च महिन्यातील ९.४२ टक्क्यांहून एप्रिलमध्ये ४.५० टक्क्यांनी घट झाली.

तसेच इंधन आणि ऊर्जेच्या महागाईचा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्क्यांवरुन एप्रिलमध्ये ३८.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. पेट्रोलच्या महागाई दरात ६०.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एचएसडी (हाय स्पीड डिझेल) मध्ये ६६.१४ टक्के आणि एलपीजीचा दर ३८.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स विभागात एप्रिलमध्ये १०.८५ टक्क्यांवर पोहोचला तत्पूर्वी हा दर १०.७१ टक्के होता.

गेल्या महिन्यात किरकोळ महागाईची जी वेगळी आकडेवारी जाहीर झाली होती. त्यानुसार किरकोळ महागाईचा दर गेल्या आठ वर्षातील उच्चांक होता. जो एप्रिल २०२२ मध्ये ७.७९ टक्के इतका होता.