दिल्ली राजपथावर झाला महाराष्ट्रातील ‘नारीशक्तीचा जागर’

नवी दिल्ली,२६ जानेवारी / प्रतिनिधी:- आज २६ जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिनी. देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. तसेच, दरवर्षी यादिवशी दिल्ली राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होतात. यंदाच्या वर्षी संचलनात महाराष्ट्राचा ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये राज्यातील साडे तीन शक्तिपीठे दाखवली गेली.

राज्यामध्ये आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश होतो. यंदाच्या संचलनात नारीशक्तीचे दर्शन सर्व देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळाले. या संकल्पनेचा महिमा सांगणारे गाणे लिहिण्याचे सौभाग्य हे डोंबिवलीच्या प्राची गडकरी यांना लाभले होते. त्यामुळे, आज डोंबिवलीकरांसाठी मोठा आनंदाचा दिवस ठरला. तसेच, कौशल इनामदार आणि वैशाली सामंत यांनी संगीत दिले आहे.