दिल्लीतही शिवसेना पक्षाला मोठा हादरा -शिवसेनेच्या 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली : एकनाथ शिंदे

नवी दिल्ली,१९ जुलै /प्रतिनिधी :- महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत असून त्यांनी बंडखोर खासदारांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

सर्व बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन 12 खासदारांचं पत्र दिलं आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केलं.

जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्याला राज्यभरातून स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्याचं समर्थन केलं आहे. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवं होतं ते, आता झालं, जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेतंय, केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारला पाठिंबा मिळतोय. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा त्या राज्याचा विकास आणि उत्कर्ष होत असतो. त्यामुळे मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. 

संबंधित १२ खासदारांनी लोकसभेत शिवसेनेचा एक वेगळा गट स्थापन करण्याबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. या पत्रात राहुल शेवाळे यांचा उल्लेख गटनेते म्हणून करण्यात आला आहे, तर शिवसेना खासदार भावना गवळी यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून करण्यात आला आहे.

शिंदे गटाला पाठिंबा असलेले शिवसेनेचे 12 खासदार

शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि प्रतोद भावना गवळी, खासदार कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे यांची नावं घेतली.

एकनाथ शिंदेंची भेट घेताच शिवसेना खासदारांना १२ हत्तींचे बळ आले असून ते आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले. यावेळी शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी दोन मागण्या केल्या आहेत. विनायक राऊत यांच्याकडे गटनेतेपद आहे, ते राहुल शेवाळेंना आम्ही निवडले आहे. त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच आम्हाला शिवसेनेचे कार्यालय नको, नवीन कार्यालय द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेना खासदारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे ठाकरे गटास आता कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.

“जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. जनतेच्या मनातले सरकार आम्ही राज्यात स्थापन केले आहे आणि याचे स्वागत या १२ खासदारांनीही केले आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी येथे आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचे स्वागतही करण्यासाठी येथे आलो आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावापोटी खासदार फुटले आहेत अशी टीका संजय राऊत यांच्याकडून केली जात आहे. याबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सणसणीत टोला लगावला. “दुसरं कोण बोललं असतं तर मी बोललो असतो. पण संजय राऊत काही दखल घेण्यासारखे नाहीत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच संजय राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात. त्यांच्या बोलण्याला काय महत्व द्यायचे?, असेही ते म्हणाले.