भारतीय हवाई दलात राफेल विमानांचा समावेश

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

भारतीय हवाई दलाची (आयएएफ) पहिली पाच राफेल विमाने आज अंबाला येथील हवाई तळावर दाखल झाली. 27 जुलै 2020 रोजी सकाळी या ताफ्याने फ्रान्स येथील मेरिनाकच्या डसॉल्ट एव्हिएशन सुविधेतून उड्डाण केले आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अल धाफरा हवाईतळावर नियोजित विराम घेऊन आज दुपारी भारतात पोहोचले.

भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हे उड्डाण हाती घेतले होते आणि याचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले होते. या विमानांनी फ्रान्स ते भारत असे जवळपास 8,500 किलोमीटर अंतर पार केले आहे. या ताफ्याने 5,800 किलोमीटरचा पहिला टप्पा साडेसात तासांत पूर्ण केला. या विमानप्रवासात फ्रान्स हवाई दलाच्या (एफएएफ) टँकरने हवेतल्या हवेत (एअर-टू-एअर) विमानांना इंधन पुरवठा केला. विमान प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात 2,700 किलोमीटरचे अंतर कापताना राफेल विमानांना भारतीय हवाई दलाच्या वतीने हवेतल्या हवेत (एअर-टू-एअर) इंधन पुरवठा करण्यात आला. विमानांचे वितरण वेळेवर सुनिश्चित करण्यासाठी फ्रान्स सरकार आणि फ्रान्समधील उद्योग क्षेत्राद्वारे प्रदान केलेल्या सक्रीय पाठिंब्याचे भारतीय हवाई दलाने  मनापासून कौतुक केले. उड्डाणाच्या  वेळी फ्रान्स हवाई दलाने देऊ केलेली टँकरचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले, ज्यामुळे लांब पल्ल्याचे उड्डाण यशस्वीपणे आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करता आले.

हे विमान 10 सप्टेंबर 2019 रोजी पुनरुत्थान झालेल्या 17 स्क्वॉड्रन, ‘गोल्डन एरो’ चा एक भाग असेल, स्क्वॉड्रनची स्थापना 1 ऑक्टोबर 1951 रोजी अंबालाच्या हवाई तळावर करण्यात आली होती. 17 स्क्वॉड्रनला आतापर्यंत प्रथमतेचे बरेच श्रेय मिळाले आहे, 1955 मध्ये पहिले जेट फायटर, दे हेविलँड व्हॅम्पायर सुसज्ज करण्यात आले. ऑगस्ट 1957 मध्ये स्वीप्ट विंग फायटरचे, हॉकर हंटर मध्ये रुपांतर करण्याचा पहिला मान स्कॉड्रनला मिळाला.

राफेल विमानांचा 17 स्क्वॉड्रनमध्ये समावेशाचा औपचारिक सोहळा ऑगस्ट 2020 च्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. समारंभाचा सविस्तर तपशील लवकरच सांगितला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *