‘पै न पै मधून गरिबांचे कल्याण’ ह्या तत्वावर सरकार काम करत आहे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

गेल्या नऊ वर्षात भारत पाच कमकूवत देशांच्या यादीतून पाच अव्वल देशांच्या यादीत पोहोचला : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा झेंड्याला जगातील सर्वात मजबूत ध्वज बनवले आहे: अनुराग ठाकूर

नवी दिल्ली,२७ मे / प्रतिनिधी:- केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात, “नऊ वर्षे : सेवा, सुशासन, गरीब कल्याण” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन,  माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव  अपूर्व चंद्रा आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी प्रमुख गौरव द्विवेदी हे देखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी, 2014 च्या आधीचे सरकार आणि त्यानंतरचे सरकार यांच्या कामगिरीची तुलनात्मक मांडणी केली आणि ते म्हणाले की, पूर्वीचे सरकार “घोटाळ्यांचे सरकार” म्हणून ओळखले जात असतांना, सध्याचे सरकार मात्र,  ‘पाई पाई से गरीब की भलाई’ म्हणजे – ‘पै न पै चा गरिब कल्याणासाठी वापर ’ या तत्त्वावर काम करते आहे. ज्या प्रकारे गरीब आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून, सरकारच्या योजना आणि  कार्यक्रम यांची अंमलबजावणी केली जात आहे,  त्यातून हाच भाव स्पष्ट होतो, असेही ते पुढे म्हणाले.

स्वतःच्या मालकीचे घर असणे ही घटना, गरीब माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवणारी असते आणि हे साध्य करण्यासाठी, पीएम आवास योजनेअंतर्गत साडे तीन कोटी घरे बांधण्यात आली आहेत, ज्यातून, लोकांच्या जीवनमानात गुणात्मक फरक जाणवतो आहे,असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

प्रत्येक घराला नळ जोडण्या देण्याची कल्पना, कायमच अशक्यप्राय समजून हे  लक्ष्य साध्य करण्याचा विचारही कोणी कधी केला नाही. मात्र, पंतप्रधानांनी हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि आज, 12 कोटी लोकांच्या घरात नळ जोडण्या पोहोचल्या आहेत. त्याचवेळी, केंद्र सरकारने महिलांना चुलीच्या धूरापासून होत असलेला त्रास कमी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु केले असून, त्या अंतर्गत, 9.6 कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर्स दिले आहेत, असेही वैष्णव यांनी सांगितले.

त्याशिवाय, लोकांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी, आधार देण्यासाठी सरकारने घेतलेल्या  पुढाकाराविषयी त्यांनी संगितले. जेव्हा, संपूर्ण जग, कोविड-19 महामारीच्या संकटातून जात होते, त्यावेळी, लोकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सरकारने 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची योजना आणली. कोणत्याही सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शौचालयासारख्या मूलभूत मानवी गरजा, ज्या सर्वसमावेशक विकासाचे निदर्शक आहेत याबद्दल चर्चा केली नव्हती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा संकल्प केला. त्यानंतर,  आज 11.72 कोटी शौचालये बांधून महिला सुरक्षा आणि स्वच्छता क्षेत्रात क्रांती आणली आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत आज आयुष्मान भारत अंतर्गत जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना  चालवत आहे ज्याअंतर्गत, गरजूंसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची तरतूद केली आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. जितक्या लोकांना, ह्या योजनेचा लाभ मिळत आहे,  त्यांची संख्या अमेरिका आणि रशियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सामाजिक न्यायाची नवी व्याख्या तयार केली असून लांगूलचालनाच्या पलीकडे जात, लोकांच्या सक्षमीकरणाच्या हेतूने सामाजिक योजना राबवल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

देशांतर्गत, पायाभूत सुविधांची उभारणी यात 2014 पासून अभूतपूर्व बदल झाला आहे, याआधी, योग्य मानसिकता आणि विचारप्रक्रियेच्या अभावामुळे, पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा समग्र विचार नव्हता, असे ते म्हणाले. गेल्या केवळ  नऊ वर्षात देशात 74 विमानतळ बांधले गेले, त्याआधी, म्हणजे  स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या काळात देशात 74 विमानतळ विकसित झाले होते . स्वातंत्र्यानंतर 91 हजार किलोमीटरचे रस्ते तयार झाले, तर, 2014 पासून आतापर्यंत जवळपास 54 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. 2014 पर्यंत देशात कोणतेही जलमार्ग नव्हते, आज मात्र,111 जलमार्ग आहेत आणि भारतातील रेल्वे स्थानकांवर विमानतळांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत, असे वैष्णव म्हणाले.

भारत दीर्घकाळ जागतिक आर्थिक क्रमवारीत पिछाडीवर होता, परंतु आज भारत 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून  जगाच्या पटलावर दिमाखात उभा आहे. असे त्यांनी सांगितले. आणखी दोन वर्षांत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून पुढच्या सहा वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सुरक्षेविषयी सरकारच्या असलेल्या दृढनिश्चयी कटिबद्धतेविषयी बोलतांना ते म्हणाले आधी भारताला मोठ्या दहशतवादी कारवाया झेलाव्या लागल्या होत्या , मात्र आज अशाप्रकारच्या कोणत्याही दहशतवादी कृत्यांचा सामना करण्यास भारताची इच्छाशक्ती आणि साधने दोन्ही सज्ज आहेत, असे वैष्णव म्हणाले.

गेल्या 9 वर्षात भारतातील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात स्वप्नवत बदल झाले आहेत आणि सरकारने विविध क्षेत्रात लोकांच्या अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली आहे असे अनुराग ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. एकेकाळी भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळे भारत म्हणजे एक दुर्बळ आणि विखुरलेली अर्थव्यवस्था होती, मात्र आज या अर्थव्यवस्थेने ‘फ्रॅजाईल फाईव्ह’पासून जगातील सर्वोच्च पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यापर्यंतचे अंतर कापले आहे, असे ठाकूर म्हणाले.

सरकारच्या योजनांचे लाभ पूर्वी केवळ मोजक्या लोकसंख्येपर्यंतच पोहोचत होते, तर आज सरकार अंत्योदय या घोषवाक्याला अनुसरून काम करत आहे, ज्यामध्ये टोकाला असलेल्या शेवटच्या व्यक्तीच्या पुनरुत्थानासाठी देखील सरकार वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.27% लोकांना गरिबीमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचे गुपित यामध्येच लपलेले आहे, असे त्यांनी नमूद केले. सेवाभाव, मोठ्या कल्पना, सुशासन, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व यांच्या एकत्रित मिश्रणाचा  वितरण यंत्रणेमध्ये केलेला समावेश यामुळे सार्वजनिक सेवांचे लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.   

वसाहतवादी इतिहास त्याग करून आधुनिक आणि देशातील आदर्श प्रतीकांचा स्वीकार करण्याचा सरकारचा दृढनिश्चय आहे, असे ते म्हणाले. कर्तव्य पथाची निर्मिती हा त्याचा दाखला आहे आणि नव्या संसदेमधून त्याचा दाखला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या देशाच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची असेल असे पंतप्रधान म्हणाले होते याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. याच अनुषंगाने ठाकूर यांनी सुमारे एक लाख स्टार्ट अप आणि शंभरपेक्षा जास्त युनिकॉर्न निर्माण करण्याच्या एका ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान भारताला मिळवून देण्याचे श्रेय युवा वर्गाला दिले. 

एकीकडे पंतप्रधानांनी दिलेल्या हर घर तिरंगा या आवाहनाला देशाने प्रतिसाद दिला तर दुसरीकडे ऑपरेशन गंगा दरम्यान याच तिरंगा ध्वजाचा वापर इतर देशाच्या विद्यार्थ्यांनी संघर्षग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी केला, असे त्यांनी सांगितले. अनेक सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधानांना सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरवण्यात आले आहे असे सांगत ठाकूर म्हणाले की खरे तर त्यांनीच तिरंगा ध्वज हा जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान ध्वज बनवला आहे.

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिवसभरात विविध संकल्पनांवरील सत्रांमध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. समाजाच्या विविध स्तरांमधील प्रेक्षकांचे देखील त्यांनी स्वागत केले.