दहिसर महिलांसाठी सुरू असलेल्या या भरतीदरम्यान मोठा गोंधळ ; सौम्य लाठीमार

WATCH: Women candidates clash with Mumbai Police during Fire Brigade  recruitment drive

मुंबई ,​४​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- दहिसरमध्ये अग्निशमन दलाची भरती सुरू झाली आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या या भरतीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. या भरतीत काही तरुणींना अपात्र ठरवण्यात आल्याने या तरुणींनी संताप व्यक्त केला. मैदानातच त्यांनी जोरदार विरोध सुरू केला. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत या तरुणींनी जोरदार घोषणा दिल्या. तरुणी अचानक आक्रमक झाल्याने भरती प्रक्रिया थांबली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलक तरुणींना मैदानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणी अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. अनेक तरुणींच्या पायाला, हाताला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तापले.

भरतीसाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून तरुणी आल्या होत्या. या मुलींनी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकला होता. अचानक यावेळी त्यांना त्याच्या उंचीचे कारण देत अपात्र ठरवण्यात आले. अग्निशमन दलाने ठरवून दिलेल्या उंची मर्यादेपेक्षा उंच असूनही तरुणींना डावलण्यात आले. त्यामुळे या तरुणींचा राग अनावर झाला आणि त्यांनी आंदोलन सुरू केली. या तरुणींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा दिल्या. सर्व तरुणी मैदानात आल्या आणि जोरदार घोषणाबाजी करू लागल्या. या सर्व प्रकरणामुळे भरती प्रक्रिया थांबली. परिसरात अचानक गोंधळ झाल्याने पोलिसांनी तरुणींना पांगवण्यासाठी लाठीमार केला. 

अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या आहेत. यावेळी भरतीसाठी १६२ सेट सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त उंची असल्याचे सांगत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी मैदानाच्या परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेले २ दिवस आम्ही इथे आलो आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तसेच अशाप्रकारे आमच्यावर अन्याय होत असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.