खुलताबादेतील विकासकामे अधिक दर्जेदार करा- राज्यमंत्री आदिती तटकरे

सुलीभंजन, घृष्णेश्वर, भद्रा मारोती मंदिरांची पाहणी

औरंगाबाद ,१७ मे /प्रतिनिधी :- पर्यटन विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत, तसेच सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ आणि खुलताबाद शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्योग, पर्यटन, खनिकर्म, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज झाले. ही विकासकामे अधिक दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला केल्या.

May be an image of 7 people and people standing

            सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत खिर्डी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सतीश चव्हाण, खिर्डी ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर, कैलास पाटील, उपसरपंच कृष्णा दवंडे, ग्रामपंचायत नवनाथ हिवर्डे, कृष्णा चव्हाण नवनाथ हिवर्डे, कृष्णा चव्हाण, रूपाली हिवर्डे, अनिता वरकड, सुशीला पांडव, छाया घोडके, राधा दवंडे आदींची उपस्थिती होती.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, विविध पर्यटन स्थळे असलेल्या खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा असाव्यात. या पर्यटन स्थळांच्या विकासातूनच पर्यटक, भाविक खुलताबादेत येतील. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

            खिर्डीतील नवीन इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत येईल. याठिकाणच्या जुन्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लेखा परीक्षण करून या इमारतीचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. खिर्डी ते खुलताबाद चार कि.मी रस्त्याचेही काम आमदार चव्हाण यांच्या पुढाकारातून होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी खिर्डी ग्रामस्थांना दिला. खिर्डीत व्यायामशाळा उभारण्यासाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी क्रीडा विभागास दिल्या.

May be an image of 15 people and people standing

            आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकास योजना 2021-22 अंतर्गत विशेष रस्ता अनुदान अंतर्गत मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग 211 ते सुलिभंजन रस्त्याच्या सुधारण्यासाठी एक कोटी, सुलीभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात संरक्षण् भिंत बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री तटकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी सुलीभंजन येथील सरपंच सय्यद इलियास यांनी सुलीभंजन येथील रखडलेल्या रस्त्यास मंजुरी दिल्याबद्दल राज्यमंत्री तटकरे यांचे आभार मानले. राज्यमंत्री तटकरे यांनी दत्त मंदिराची पाहणी करून या परिसरातील विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिला.

May be an image of 10 people and people standing

वेरूळ, म्हैसमाळ, खुलताबादेतील विकासकामांचे भूमिपूजन

May be an image of 10 people and people standing

            वेरूळ येथील घृष्णेशवर, म्हैसमाळ येथील गिरीजा माता, खुलताबादेतील भद्रा मारोती मंदिरांची पाहणी करून येथील विविध विकासकामांचे भूमिपूजनही राज्यमंत्री तटकरे यांच्याहस्ते झाले. म्हैसमाळ येथील मंदिराच्या मागे असलेल्या येळगंगा नदीवर घाट बांधकाम करणे, भाविकांसाठी वाहन तळ, स्वयंपाक घराचे शेड बांधकाम, घृष्णेश्वर मंदिराच्या भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, खुलताबादेत विठ्ठल रूखमाई मंदिरासमोर सभा मंडप, रस्ते तयार करणे आदी कामांचा समावेश असून या कामांचेही भूमिपूजन राज्यमंत्री तटकरे यांनी केले.

रूग्णवाहिकेचे लोकार्पण

May be an image of 8 people and people standing

            सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या होमिओपॅथी महाविद्यालय व रूग्णालयास देण्यात आलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण राज्यमंत्री तटकरे यांच्याहस्ते झाले. या रूग्ण्वाहिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा राज्यमंत्री तटकरे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक या रूग्णवाहिकेचा जबाबदारीने वापर करून ग्रामीण भागात सेवा द्यावी, असे आवाहनही राज्यमंत्री तटकरे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी आमदार चव्हाण, पाटील, ट्रस्टच्या संचालक उमा कुलकर्णी, सचिव अक्षय कुलकर्णी, पी.वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.