रेमडेसिविरचा काळाबाजार ,चारही आरोपींची रवानगी हर्सूल जेलमध्ये 

औरंगाबाद ,२०एप्रिल /प्रतिनिधी 

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत नामदेव तौर (रा.सहयोगनगर, गारखेडा परिसर), मंदार अनंत भालेराव (रा.शिवाजीनगर, गारखेडा परिसर), अनिल ओमप्रकाश बोहते (शिवाजीनगर, गारखेडा परिसर),दिपक सुभाषराव ढाकणे (३२, रा. रेणुका मेडीकल, एजन्सी यशोदा कॉम्पलेक्स अंबीका चौक, पांगरी रोड बीड) या चौघांची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी मंगळवारी दि.२० दिले आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून अव्वाच्या सव्वा दरात विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात इंदिरा मेडिकल स्टोअर्सचे मालक अभिजित तौर, मंदार भालेराव, जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी अनिल बोहते या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी १६ एप्रिल रोजी अटक केली होती. चौकशीदरम्यान, अभिजित तौर याने बीड येथून रेमडेसिविर इंजेक्शन आणून विक्री करीत असल्याची कबूली दिल्यावर पोलिसांनी बीड येथून रेणूका मेडिकलचे दिपक ढाकणे यांना अटक केली होती. अटकेत असलेल्या चौघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी.दुबे यांनी चौघांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.