जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर नक्कीच यश मिळते : पोलिस अधीक्षक अनिता जमादार

औरंगाबाद ,१७ मे /प्रतिनिधी :- पोलिस भरतीत यश मिळवण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब न करता जिद्द आणि प्रामाणिक मेहनत केली तर निश्चितच दीर्घकाळ टिकणारे यश मिळेल अशी प्रतिपादन लोहमार्गाच्या पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांनी केले. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवलेल्या रेड्डी स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

रेड्डी स्पोर्ट्स अकॅडमीच्या आजवर ९०० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड पोलिस  व इतर शासकीय सेवेत झालेली असून नुकतेच ४७ विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पी.ई.एस. शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य पंकज भारसाखळे, कार्यकारी अभियंता भालचंद्र कुलकर्णी, प्राचार्य डॉ.भास्कर साळवे, रेड्डी अकॅडेमिचे भरत रेड्डी, रखमाजी जाधव, मिलिंद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गरीब विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नौकरी मिळून देणार्या रेड्डी स्पोर्ट्स अकॅडेमिच्या कार्याचे कौतुक करत पंकज भारसाखळे यांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासित केले. यावेळी रेड्डी स्पोर्ट्स अकॅडमीच्या पोलीस उपनिरीक्षक झालेल्या ४७ विद्यार्थ्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील तांगडे आणि तुषार आहेर तसेच एव्हरेस्ट वीर रफिक शेख यांच्या देखील गौरव करण्यात आला. रेड्डी अकॅडमीच्या संचालिका शुभांगी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद माने, भिकन आंबे, अभय दंडघवाल, अनिल निळे यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केले.