औरंगाबाद जिल्ह्यात 11676 कोरोनामुक्त, 3589 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.06 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 155 जणांना (मनपा 124, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11676 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 283 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15774 झाली आहे. आजपर्यंत एकूण 509 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3589 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 207 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 45 , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आणि ग्रामीण भागात 95 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबादेत १२ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील नऊ, तर बीड जिल्ह्यातील एक व जळगाव जिल्ह्यातील दोन, अशा १२ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (घाटी) खासगी रुग्णालयांध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३८८, तर जिल्ह्यात ५०९ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गुरुवारी (६ ऑगस्ट) दिवसभरात २८३ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५,७७४ झाली आहे.
शिऊर (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील ८२ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाला वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातून ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता घाटीत दाखल केले होते व रुग्णाला तपासून मृत घोषित करण्यात आले होते. पाडळी बोरगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला २१ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी चार वाजता मृत्यू झाला. चाळीसगाव (जि. जळगाव) येथील ६८ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाला बुधवारी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी सायंकाळी पावणेसात वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. बीड येथील ४३ वर्षीय पुरुष रुग्णाला १ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी दुपारी साडेतीन वाजता मृत्यू झाला. कन्नड (जि. औरंगाबाद) येथील लंगोटे महादेव रोड परिसरातील ७४ वर्षीय पुरुष रुग्णाला २ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी मृत्यू झाला. मुकुंदवाडीच्या संघर्ष नगर येथील ५३ वर्षीय महिला रुग्णाला ३१ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याच दिवशी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला. तसेच जळगाव येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाला २० जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याचदिवशी निदान झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा गुरुवारी सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी मृत्यू झाला.