साखर कारखान्यांनी 31 मे पर्यंत ऊस तोडणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,१७ मे /प्रतिनिधी ;- वैजापुर – गंगापूर  विधानसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, कोळपेवाडी, संगमनेर व प्रवरानगर येथील साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी नोंदणी केली आहे. या कारखान्यांकडे तालुक्यातील सुमारे साडे चौदाशे एकर ऊस तोडण्याचे उद्दिष्ठ असताना अद्याप हा ऊस शेतात गाळपाअभावी उभा असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शिवाय नोंदणी न झालेल्या ऊसाचा प्रश्नही गंभीर आहे‌. त्यामुळे कारखान्यांनी 31 में पर्यंत ऊस तोडणी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच नोंदणी न झालेल्या ऊसाच्या बाबतीतही तडजोडीचे धोरण स्वीकारुन ऊस तोड करावी असे निर्देश आमदार प्रा.रमेश पाटील बोरणारे यांनी शिल्लक उसासंदर्भात झालेल्या बैठकीत कारखान्यांच्या प्रतिनिधींना दिले. 

साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनीही आमदार बोरनारे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील तोडणीअभावी शिल्लक असलेला ऊस व नोंदणी न झालेल्या ऊसाच्या प्रश्नावर येथील उपविभागिय अधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकित उपविभागिय अधिकारी  माणिक आहेर यांनीही कारखान्यांना लवकरात लवकर ऊस तोड करुन गाळपासाठी नेण्याचे आदेश दिले.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा  माजी सभापती बाबासाहेब जगताप, जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव, राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के. जाधव, तालुका कृषि अधिकारी अशोक आव्हाड,. माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे तालुक्यात सर्वाधिक अठरा गावात 900 एकर क्षेत्रावरील ऊस तोडीचे उद्दिष्ठ असून त्यापाठोपाठ कोळपेवाडी शंभर एकर, संगमनेर साडे तीनशे एकर व प्रवरा साखर कारखान्याचे 90 एकर क्षेत्रावरील ऊस तोडण्याचे उद्दिष्ठ आहे. परंतू या कारखान्यांनी गाळपासाठी ऊस न तोडल्याने हवालदिल झालेल्या ऊस उत्पादकांनी बैठकीत तक्रारींचा भडिमार केला. कारखान्यांनी नोंदणी झालेला ऊस देखील न तोडल्याने 30 मे पर्यंत मान्सुनपुर्व पाऊस, वादळ व तत्सम नैसर्गिक आपत्तीत ओढवल्यास झालेल्या नुकसानीची कारखान्यांनी भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, शिल्लक ऊसाचा प्रश्न आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अधिवेशना दरम्यान मांडला असून पवार यांनी तालुक्यातील संपुर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे आदेश कारखान्यांना दिल्याचे आमदार बोरणारे यांनी सांगितले.  या प्रसंगी. उपतालुका प्रमुख महेश बुनगे, डाॕ. शेळके, छगन सांवत, रामचंद्र पिल्दे यांच्यासह ऊस उत्पादकशेतकरी उपस्थित होते.

तालुका कृषि कार्यालयातर्फे कृषि सहायकांच्या माध्यमातुन तालुक्यातील नोंदणी झालेला ऊस, नोंदणी न झालेला ऊस, क्षेत्र याचा डाटा दोन दिवसांत तयार करावा अशी सुचना आमदार रमेश बोरणारे यांनी कृषि विभागाला केली. त्यानुसार कृषि विभागातर्फे येत्या दोन दिवसांत हा डाटा तयार करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.