विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई ,७ डिसेंबर / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 868 कोटी 64 लाख रुपयांची नुकसानभरपाई रकमेचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असून प्रलंबित 364 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री  श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसान भरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. आतापर्यंत एकूण 39 लाख 88 हजार 380 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 868 कोटी 64 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करावी. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी विमा कंपन्यांना दिले.

मंत्रालयात यासंदर्भात भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पोक्रा-२ मध्ये नवतंत्रज्ञान, कृषि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई:- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) माध्यमातून कृषि व ग्राम विकासाचे काम होत आहे. पहिल्या टप्प्यात कृषि विषयक योजनांच्या अंमलबजावणीतून पायाभूत सुविधांना बळकटी करण्याचे काम झाले. पोक्राचा दुसरा टप्पा हा अधिक विस्तारित, अधिक गावांचा सहभाग असणारा आणि कृषि क्षेत्रात झालेल्या संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशा स्वरुपाचा असावा आणि त्यासाठी जागतिक बॅंकेने सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मंत्रालयात आज पोक्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख रंजन सामंतराय यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर – देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, पहिल्या टप्पा राबविताना आपण सर्वप्रथमच अनेक गोष्टी करीत होतो. साडेचार वर्षाच्या काळात आता कृषि विषयक योजनांच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यासाठी अधिकच्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ते जाणवले आहे. त्यामुळेच अशा बाबींना नव्या टप्प्यात समाविष्ट करण्याची गरज आहे. पीक उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न केले. त्याचबरोबर आता पीक उत्पादनाच्या विक्रीसाठीची व्यवस्था तयार करणे, नवतंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे याबाबींना आता अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. यासाठी विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ, हवामान बदल, पीक पद्धतीतील बदल याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचेही सहाय्य घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख श्री.सामंतराय म्हणाले की, पहिला टप्पा संपताच लगेचच दुसऱ्या टप्प्याची  अंमलबजावणी सुरु व्हावी, असा प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि जागतिक बॅंकेने प्रामुख्याने दुष्काळप्रवण जिल्ह्यांच्या विकासासाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. सध्या बिजोत्पादन ते पीक उत्पादन, पीक उत्पादन ते काढणीपश्चात मशागत, कृषि यांत्रिकीकरण अशा विविध बाबींचा विचार पहिल्या टप्प्यात केला गेला आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक स्वरुपात पोक्रा-2 राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त श्री. चव्हाण यांनी, पीक उत्पादनानंतर त्याचे मार्केटींग आणि विक्रीसंदर्भात व्यापक स्वरुपात काही करता येईल का, याबाबत जागतिक बॅंकेने मदत करावी, असे सांगितले.