घाबरून न जाता सावधानता बाळगत कोरोनाला हरवूया – राज्यपालांचा सल्ला

मुंबई, दि. ११ : कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना आणि सावधानता बाळगून कोरोनाला हरवू या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिला.

‘जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन राजभवन येथे झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यावेळी उपस्थित होते.

राज्यपालपदी नियुक्ती होऊन 5 सप्टेंबरला एक वर्ष झाले त्यानिमित्त वर्षभरातील कार्याचा सचित्र अहवाल या पुस्तकरूपाने मांडण्यात आला आहे.

राज्यपाल यावेळी म्हणाले, गेल्या वर्षभरात मी राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांचा दौरा केला. राज्यातील दुर्गम भाग असलेला गडचिरोली, नंदुरबार, पालघर याभागाचा दौरा केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ‘मोलगी’ या गावामध्ये मी मुक्काम केल्याचा अनुभवही राज्यपालांनी यावेळी सांगितला. कोरोनाकाळातही दौरे केल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षभराच्या काळात २५० शिष्टमंडळांनी भेट घेतल्याचे सांगताना राज्यपाल म्हणाले, प्रत्येक दिवस हा कामाचा असतो त्यामुळे सुटीच्या दिवशीही काम करण्याचा माझा प्रयास असतो असे त्यांनी सांगितले. प्रत्येक बाबतीत ईच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यासंदर्भात राज्यपालांनी ५० मिनिटात शिवनेरी पायी चढून गेल्याचे उदाहरण दिले. यावेळी राज्यपालांनी वर्षभराच्या कालावधीत केलेल्या विविध बाबींचा आढावा घेतला.

वर्षपूर्तीनिमित्तचे ई बुक राजभवनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये क्यूआरकोड आणि ई लिंकचाही वापर करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *