एमआयएमकडून महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर

महाविकास आघाडीने धुडकावली एमआयएमची ऑफर 

औरंगाबाद/मुंबई ,१९ मार्च /प्रतिनिधी :-ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला आम्ही युती करण्यास तयार आहोत अशी खुली ऑफर दिली आहे. यावरून महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.तसेच विरोधी पक्षांकडून यासंबंधांत महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले ,” महाविकास आघाडी हे तीन चाकी सरकार आहे. आमच्याबरोबर युती करा मग हे सरकार चारचाकी होऊन जाईल.” या एमआयएमकडून आलेल्या ऑफरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहे. 

राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. हे खरं आहे की ते भेटायला आले होते. माझ्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आले होते. त्यावेळी आमच्यात चर्चा सुरू होती. आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत. कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज जलिल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

या देशात सर्वात जास्त नुकसान जर कोण करत असेल तर ते भाजप आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. उत्तरप्रदेशात सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपा सोबत बोलणं केलं होतं. पण त्यांना मतं हवी आहेत आणि ओवैसी  नकोयत, एमआयएम पक्ष नकोय. म्हणून मी त्यांना ऑफर दिली की, चला आपण दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवूया असंही इम्तियाज जलिल म्हणाले.

राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की समविचारी पक्ष एकत्र आल्यास आनंदाची गोष्ट आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हंटले की ” औरंगजेबासमोर आम्ही कधी गुडघे टेकणार नाही “. त्यांनी युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. 

संजय राऊतांचा एमआयएमवर घणाघात
May be an image of 1 person

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे आणि हेच समीकरण राहणार आहे. यात बाकी कुणीही काही करु शकत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती सर्वांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाहिली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी एमआयएमवर जोरदार हल्ला चढवलाय.

शिवसेना खा. संजय राऊत यांनी एमआयएम हा भाजपचा टीम ‘बी’ असल्याचं म्हटलंय. शिवसेनेच्या या मुद्दयाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुजोरा दिलाय. सपाच्या पराभावला एमआयएम जबाबदार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी सोबत येण्याची तयारी दर्शविली आहे, असं सांगितलं. यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये, बंगालमध्ये पाहिले आहे. हा पक्ष आधीच भारतीय जनता पक्ष सोबत काम करत असून ते ‘बी टीम’च आहेत, असा आरोप केला. 

एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा समज त्यांनी आधी कृतीतून घालवावा! – जयंत पाटील
May be an image of 1 person, standing and sitting

एमआयएम या राजकीय पक्षाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छुक असल्याच्या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आज आपली भूमिका मांडली. आम्ही एक जिल्हा किंवा राज्य म्हणून नाही तर संपूर्ण देशाचा विचार करतो. उत्तर प्रदेशमध्ये एमआयएममुळे समाजवादी पक्षाला अनेक मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.लोकांचा एमआयएमवरचा विश्वास उडालेला आहे. त्यांचा वापर भाजपची ‘बी टीम’ म्हणून होत आहे, हे लोकांना आता हळुहळू कळायला लागले आहे. एमआयएमला भारतीय जनता पक्षाच्या पराभवात रस असेल, तर तशी कृती त्यांनी करून दाखवली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

“एमआयएम समविचारी पक्ष आहे का, याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएमचा भारतीय जनता पक्षाच्या सध्या चाललेल्या वर्तनाला विरोध असेल तर त्यांनी तो प्रत्यक्ष कृतीत दाखवला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचा पराभव झाला. तिथे जवळपास ८६ मतदारसंघांत दोन हजारांपेक्षा कमी मताधिक्याने त्यांचे उमेदवार पराभूत झाले. काही ठिकाणी अवघ्या २०० ते ३०० मतांनी पराभूत झाले आहेत. त्याठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी दोन ते तीन हजार मते घेतलेली आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये एकप्रकारे एमआयएमची भारतीय जनता पक्षाला मदतच झाली.

भारतीय जनता पक्ष एखाद्या समाजाची मते विशिष्ट पक्षाला पुढे करून मिळवतो. काही लोक आमिषाला बळी पडतात. त्यामुळे विरोधी मते एकत्र न होता निवडणुकीत विरोधी पक्षांना फटका बसतो. इम्तियाज जलील यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी कृतीतून हे दाखवून दिले पाहिजे. ज्यांच्यासोबत त्यांना युती करायची आहे, त्या पक्षाच्या विचारधारेशी मिळतीजुळती त्यांची कृती असली पाहीजे. जातीयवाद वाढणार नाही, असे वागले पाहीजे. तसेच तशाप्रकारची विधानेही टाळली पाहिजेत, अशी सूचना जयंत पाटील यांनी केली.

भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात की ” वाह.. एमआयएमची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..आता फक्त आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी आहे..खरंच, करून दाखवलं!!”

फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
No photo description available.

देवेंद्र फडणवीस म्हणतात की “आम्हाला ठरविण्यासाठी कितीही पक्ष एकत्र येऊदेत आम्हाला फरक पडत नाही !” महाविकास आघाडीतले नेते युतीचा प्रस्ताव स्वीकारतील का ? की धुडकावून लावतील ? याचे उत्तर लवकरच मिळेल.

शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढलाय.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, अशी जोरदार टोलेबाजीही फडणवीसांनी केली.

एमआयएमने आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे 

एमआयएमने आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा केल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.जलील यांच्या वक्तव्यावर बोलताना अतुल लोंढे म्हणाले, युती किंवा आघाडी ही समान विचारधारा आणि समान उद्देश असणा-या पक्षासोबत केली जाते. विरूद्ध किंवा वेगळ्या विचारधारा असणा-या पक्षांसोबत आघाडी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. जनतेच्या हितासाठी संविधानाच्या विचारानुसार किमान समान कार्यक्रम तयार केला या कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले आणि कार्य करत आहे.

देवेंद्र फडणवीसांचाच  हा डाव -चंद्रकांत खैरे

No photo description available.

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच  हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या बैठकीत सदर प्रस्तावाची चर्चा झाल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले,’ MIM आम्हाला देऊच शकत नाहीत. शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं. आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे. आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.