व्यावसायिक भागीदारावर चाकूने वार:आरोपीला तीन महिन्‍यानंतर बेड्या

औरंगाबाद ,१७ मे /प्रतिनिधी :-व्यावसायिक भागीदारावर चाकूने वार करुन कारसह त्‍याच्‍याकडील अडीच लाखांची रोख रक्कम घेवून पसार झालेल्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी तब्बल तीन महिन्‍यानंतर बेड्या ठोकल्या. मिर्झा अरबाज बेग नौशाद बेग (२७, रा. फकिरवाडा, खुलताबाद) असे आरोपीचे नाव असून त्‍याला २० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने मंगळवारी  दिले.

या प्रकरणात गंभीर जखमी शेख मोईनोद्दीन शेख अहेमदोद्दीन (४१, रा. सुलीभंजन, खुलताबाद) यांचा मोठा भाऊ शेख फरहोनोद्दीन शेख (४१) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीचा लहान भाऊ शेख मोईनोद्दीन हा आरोपी मिर्झा अरबाज याच्‍या भागीदारीत खोबरा खरेदी-विक्रीचा व्‍यवसाय करीत होता. दोघे औरंगाबादेतील जुना मोंढ्यातून होलसेलमध्‍ये खोबरे खरेदी करुन त्‍याची विक्री करित होते. ८ फेब्रुवारी रोजी शेख मोईनोद्दीन व आरोपी असे दोघे कारने नेहमीप्रमाणे खोबरे खरेदी करण्‍यासाठी मोंढ्यात आले होते. शेख मोईनोद्दीन हा कारमध्‍ये झोपलेला असतांना आरोपीने अचानक त्‍याच्‍यावर चाकूने वार करुन गंभीर जमखी केले. त्‍यानंतर आरोपीने मोईनोद्दीन याच्‍याकडील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि कार घेवून तेथून धूम ठोकली. जखमी अवस्‍थेत मोईनोद्दीन याने फिर्यादीला फोन करुन घडलेली घटना सांगितली.

या  प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीकडून कार आणि रोख रक्कम हस्‍तगत करायची आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्‍त करायचा आहे. गुन्‍हा करण्‍यामागील नेमका उद्देश काय होता, गुन्‍हा कोणाच्‍या सांगण्‍यावरुन केला काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.