मरणोत्तर काव्यसंग्रह “बांधावर बाप उभा” प्रकाशनाने विकास जगताप यांना अभिवादन

वैजापूर,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र व सदगुरु नारायणगिरी विद्यालयाचे विकास जगताप यांना स्वर्गवासी होऊन एक वर्ष झाले त्यांच्या प्रथम वर्ष श्राध्द दिनी शुक्रवारी तालुक्यातील बल्लाळीसागज येथे त्यांनी लिहिलेल्या “बांधावर बाप उभा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र सराला बेटचे मठाधिपती हभप रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते होऊन कै.विकास जगताप याच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या पत्नी जयश्री जगताप व अशोक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन कै. जगताप यांच्या कविता जगासमोर आणल्या.

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले की,” शरीराच्या नाशाने आत्मा नष्ट होत नाही, आत्मा हा अमर असतो. कै,जगताप शरीराने आज जरी आमच्यात नसले तरी  काव्य रूपी आत्म्याने ते अमर आहेत” शेती, माती आणि ग्रामीण माणसाशी विशेषतः शेतकरी वर्गाशी कै.जगताप यांची नाळ जुळलेली होती या काव्य संग्रहातील सर्व कविता शेती – माती व बळीराजाच्या जीवनावर आधारित आहे. या प्रसंगी तिफणकार कवी प्रा.डॉ.शिवाजी हुसे (कन्नड), वैजापूर चे जेष्ठ साहित्यक धोंडिरामसिंह राजपूत, श्री. खिल्लारे, ,पुण्याचे कवी  राऊत, परभणीचे कवी इंगोले यांनी काव्य रुपी भावपुर्ण अभिवादन केले. या प्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे आप्पासाहेब पाटील,भाजपचे एकनाथराव जाधव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष तांबे, संजय निकम, बाबा चन्ने, ज्ञानेश्वर खिल्लारी, संजय बोरणारे यांची उपस्थिती होती. हभप मधू महाराज, रामभाऊ महाराज यांचीही उपस्थिती होती.