श्रीमद् भागवतात सत्य हेच अंतिम प्रमाण : आचार्य मृदुलकृष्ण गोस्वामी

दुसरे पुष्प : भाविकांनी  लुटला भक्तीरसाचा  आनंद

जालना,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- सत्य हे व्यापक असून सर्वत्र असते, प्रत्येक जीव सत्याची अपेक्षा करत असल्याने श्री. व्यासांनी श्रीमद् भागवत कथेच्या मंगल चरणात सत्याची वंदना करत कथेचा समारोपही सत्याने केला आहे .भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, शिव, माता दुर्गा ही सर्व सत्याची प्रतीके असून भागवत कथा श्रवण करणारे सत्यात रमतात, ज्यामुळे  सत्य रुपी परमात्म्यास विशेष तन्मयतेने ते प्राप्त होतात. अशा शब्दांत मानवी जीवनातील सत्याचे महत्त्व आचार्य श्री. मृदुलकृष्ण  गोस्वामी यांनी आज विषद केले. 

हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने गायत्री मंदिर परिसरातील वृंदावन धाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात शुक्रवारी दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. कथा श्रवणासाठी  भाविकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला.  संगीतमय ,उत्साहपूर्ण भक्तीगीतांवर  भाविकांनी भक्तीरसाचा  मनसोक्त आनंद लुटला. प्रारंभी मुख्य यजमान कश्मीरी लाल अग्रवाल, दैनिक यजमान संजय राठी, समिती अध्यक्ष घनश्याम गोयल ,सत्संग समिती अध्यक्ष किशोर तिवारी, संजय मुथा,पवन जोशी, यशवंत बदनापूरकर,  रामप्रसाद मुंदडा ,मनोज दायमा, रामेश्वर जोशी, श्याम लखोटिया, मेघराज चौधरी ,मनिष तवरावाला  यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

” नारद- व्यास संवाद, पांडव चरित्र व श्री शुकदेव आगमन”  या चरणांवर दुसरे पुष्प गुंफताना आचार्य श्री. मृदुल कृष्ण गोस्वामी जी यांनी प्रारंभी ” हे राधिका,,हे माधवा,,” या संगीतमय भक्तीगीताने टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले . ” अजापजाप,  प्रेम, सत्याचा आश्रय, समदृष्टी व वासनारहित प्रभू ची उपासना”  या भक्तीच्या पाच  क्रमाचे सविस्तर विवेचन करत भक्तीचा सोपान चढणारे भगवंतास प्रिय ठरतात असे त्यांनी नमूद केले.श्रीमद् भागवत हे शास्त्र असून व्यवहारीक सत्य बदलते तर परमार्थिक सत्य एकच राहते ते साक्षात नारायण असल्याचे मृदुल कृष्ण गोस्वामीजी यांनी सांगितले. शिव कृपेचे महात्म्य विषद करताना “तेरा पल पल बीता जाए ..मुख से जपले नमः शिवाय..! ” या गीताने भाविकांना शिवभक्ती तल्लीन केले. “श्रद्धा, जिज्ञासा, व निर्मत्सरता”  ही श्रेष्ठ श्रोत्यांची तीन गुण असल्याचे सांगून भगवंताच्या 24 अवतारांची माहिती त्यांनी दिली.भगवत गीतेतील चार श्लोकांवर व्यासांनी अठरा हजार श्लोक, 335 अध्याय व श्रीकृष्णाचे प्रत्येक अंग असलेले बारा स्कंद अशा श्रीमद् भागवताची निर्मिती केली असून भक्तांच्या चरित्रांचे गाणं, सोबतच स्वतः भगवंताचे महत्त्व, तसेच कर्तव्याचे निर्णय शास्त्र समाविष्ट असल्याचे मृदुल कृष्ण गोस्वामी जी यांनी नमूद केले.

 ” राम नाम के,,कृष्ण नाम के,,हिरे मोती मैं बिखराऊं गली गली…! राधे $$राधे$$ रट्टो चले आएंगे बिहारी…! अशा एका पेक्षा एक सुमधूर व बहारदार भक्ती गीतांवर आचार्य मृदुल कृष्ण गोस्वामी यांनी उपस्थित हजारो भाविकांना टाळ्यांच्या कडकडाटांसह हरिनामाच्या भक्तीत तल्लीन होत ठेका धरण्यास भाग पाडले, भाविकांनीही मनसोक्तपणे भक्तिरसात ओले चिंब होऊन आनंद लुटला. दरम्यान उद्या दुपारी दोन वाजता भागवत कथेस प्रारंभ होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने  कथा श्रवणाचा लाभ घ्यावा .असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.