कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसताना आ.बोरणारे यांना मारहाण झाल्याची बातमी पूर्णतः चुकीची – संजय पाटील निकम

वैजापूर ,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसतांना स्थानिक पत्रकारांनी खोडसाळपणाने विपर्यास करून आ.रमेश पाटील बोरणारे यांना मारहाण झाल्याची बातमी लावली ती पूर्णतः चुकीची आहे असा खुलासा शिवसेना कार्यकर्ते तथा बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम यांनी केला आहे.

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात श्री.निकम यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्याऑनलाइन बैठकीत वैजापूर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बाबीविषयी मी विषय मांडले होते. त्याचा राग आ.बोरणारे यांना आल्यामुळे त्यांनी मला अरेरावीची भाषा वापरली.माजी नगराध्यक्ष साबेर भाई यांनी आमचा वाद मिटवला त्यानंतर  तासभर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसताना वैजापूर येथील पत्रकारांनी आ.बोरणारे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन खोडसाळपणाने विपर्यास करून आ.बोरणारे यांना मारहाण झाल्याची बातमी लावली ती पूर्णतः चुकीची आहे.                   

मी गेल्या 30 वर्षांपासून बाजार समितीचा संचालक असून सभापती राहिलेलो आहे.शिवसेनेचा तालुकाप्रमुख म्हणून मी तीन वर्षे सक्षमपणे जबाबदारी संभाळलेली आहे त्यामुळे पक्षशिस्त काय आहे याचे संपूर्ण भान मला आहे.माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे पक्षशिस्तीचे उल्लंघन झालेले नाही असे श्री.संजय पाटील निकम यांनी पत्रात म्हटले आहे. तालुक्यातील विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावावे अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.