जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालविले वाहन

जालना, ४ डिसेंबर / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 4 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाची पाहणी केली. जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित होते.

आज दुपारी समृद्धी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मोटार वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लोकार्पण होत असलेल्या या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची आज पाहणी केली.

जालना जिल्ह्यात 42 किमीचा मार्ग

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्ह‌्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.
बुलडाणा जिल्हयातून येणारा समृध्दी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील नाव्हा येथून सुरू होऊन बदनापूर तालुक्यातील गेवराईबाजार येथून पुढे औरंगाबाद जिल्ह्याकडे हा महामार्ग जातो.