“आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोग निदान शिबीर

औरंगाबाद ,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- कोरोना अजूनही देशातून समूळपणे गेलेला नाही आता चौथ्या लाटेचे चिन्ह दिसत असून नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व कोविड लस घेणे या बाबी कटाक्षाने करण्याची नितांत गरज आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहावे असे प्रतिपादन आ.रमेश पाटील बोरणारे यांनी सोमवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात “आझादी का अमृत महोत्सव”अंतर्गत आयोजित सर्वरोग निदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी केले.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे व त्यांचे सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या कोविड काळातील केलेल्या उत्कृष्ट कार्य व सेवेची आ.बोरणारे यांनी प्रशंसा करीत त्यांना धन्यवाद दिले. प्रारंभी आ.बोरनारे यांच्याहस्ते  धनवंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. 

प्रास्ताविक व सूत्रसंचलन जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. याप्रसंगी मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती,वजेष्ठ नागरिक रवींद्रआप्पा साखरे, साहेबराव पडवळ यांची उपस्थिती होती. या शिबिरात सर्व आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर्स करण्यात येऊन उपचार ही करण्यात आले. शिबिराला नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनीही भेट दिली.

या आरोग्य शिबिरात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाअंतर्गत व आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी ही करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री व सौ मुंढे, डॉ.राजपूत, विजय पाटील, लक्ष्मीकांत दुबे, श्याम उचित, श्रीमती भुईंगळ, (मुख्य परिचारिका) मनीषा गायकवाड, उर्मिला, निलेश चाफेकर, रवी विंकरे यांनी सहकार्य केले.शेवटी विजय पाटील यांनी आभार मानले.