महाराष्ट्र दिनी एक मे रोजी औरंगाबादमध्ये “राज” गर्जना

मुख्यमंत्री उद्धव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची राज यांच्यावर टीका 

पुणे,१७ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. ते 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत.महाराष्ट्र दिनी, एक मे रोजी औरंगाबाद  येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी  पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घोषणापूर्वीच शनिवारी हे मैदान मनसेकडून बुक करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर इतर कोणीही हे मैदान बुक करू नयेत म्हणून मनसेकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्याच्या विषयावर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले  की, भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच नाही तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का? ; राज ठाकरेंचा सवाल

या देशातील सुप्रीम कोर्ट, कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ज्यांना कायद्यापेक्षा भोंगा मोठा वाटतो त्यांना जसास तसे उत्तर देणार असल्याचेही राज यांनी सांगितले. त्यांनी जर पाचवेळा भोंगा लावून अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणार असल्याचे राज यांनी सांगितले. महाराष्ट्राची शांतता भंग करायची नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दंगल, हाणामारी करायची नाही. आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असेही राज ठाकरे यांनी म्हटले. येत्या 3 मे पर्यंत भोंगे उतरावेत असेही राज यांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.

राज ठाकरेंचं नाव घेता उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर आसूड ओढला.अंधभक्त काही वेळेला दैवत बदलू शकतो. अंधभक्त जिथे फायदा असेल तिथे झुकतो. अंधभक्त म्हणजे फक्त उदो उदो करत सुटायचं. कुणाला दैवत मानण्यामागे स्वार्थ असतो, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली.
आदित्य ठाकरे यांचा  राज ठाकरे यांना टोला
  मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी हिंदुत्त्वाचा नारा देत जोरदार कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरे आक्रमक झाले आहे. पण, अंगावरचे कपडे बदलून हिंदुत्व येत नाही, त्यासाठी हिंदुत्त्व हे रक्तात असावं लागतं, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. ‘कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्व येत नाही. हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्व आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ नक्कल पाहण्यासाठी-चंद्रकांत खैरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांनी ०१ मे रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. तर राज यांच्या या घोषणेनंतर यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी फक्त ते नक्कल कशी करतात हे पाहण्यासाठी येतात, अशी टीका खैरे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी सुभाष पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी जोरजोरात भाषण केले. मात्र त्यानंतर झालेल्या मतदानात त्यांना केवळ १७ हजार मते पडली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेत लोक फक्त ते काय बोलतात आणि कशी नक्कल करतात हे ऐकण्यासाठी येतात अशी, खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंवर केली आहे.