थाप मारून औरंगाबादच्या व्यापाऱ्याची फसवणूक मागवलेली अडीच लाख रुपयांची खजूर वैजापुरातून लंपास

वैजापूर,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :-पैसे देण्याची थाप मारुन भामट्याने औरंगाबाद येथील व्यापाऱ्याचा विक्रीसाठी आणलेला 272 खोके खजुर दुसऱ्या वाहनात टाकून लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.13) वैजापूर येथे घडली.याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमीन मुस्तफा, अजवा, निरवाना व खजुर बम अशा विविध प्रकारच्या खजुराच्या साठ्याची किंमत दोन लाख 48 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  

औरंगाबाद शहरात चेलीपुरा भागात मोहम्मद अस्लम सवानी हे खजुराचा व्यवसाय करतात. त्यांना 12 एप्रिल रोजी वैजापूर येथील व्यापाऱ्याने दर्गा रोड भागातील अल-नजराणा किराणा दुकानात 272 खजुराचे खोके पाठवण्याची ऑर्डर फोनवर दिली. माल पोहचताच खजुराचे पैसे देण्याची हमी भरल्याने सवानी यांनी वाहनातून (एम. एच.21 बी.एच.1248) 150 खोके अमीन खजुर, 60 खोके मुस्तफा खजुर, 40 खोके निरवाना खजुर, दोन खोके अजवा खजुर व 20  खोके खजुर बम असे 272 खजुराचे खोके विक्रीसाठी पाठवले. वाहनासोबत व्यवस्थापक मोहम्मद अरीफ अब्दुल करीम हे होते.

वैजापूर येथे आल्यानंतर वाहनचालक शेख राऊत शेख अब्दुल याने संबंधित व्यक्तीस फोन केला असता त्याने खजुराची गाडी घेऊन दर्गाबेस येथे येण्यास सांगितले. दर्गाबेस येथून परत फोन केला असता त्याने आंबेडकर पुतळ्याजवळ येण्यास सांगितले. त्यानंतर औरंगाबाद येथील दुकानाच्या मालकाने माझी दोन माणसे पुतळ्याजवळ येत आहेत असे सांगितले. थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आला व त्याने गोदाम गंगापूर चौफुलीवर आहे तिकडे चला असे म्हणून खजुराचे वाहन चौफुलीवर नेले. त्याठिकाणी खजुराच्या गाडीजवळ एक माणुस उभा करुन दुसऱ्या व्यक्तीने चालक व व्यवस्थापक यांना पैसे आणण्यासाठी वैजापूर शहरात जाऊ असे दोघांना शहरातील खान गल्ली भागात नेले. मात्र वैजापुरात आल्यानंतर अनेक ठिकाणी फिरवुन रक्कम दिली नाही व तोपर्यंत त्यांच्या माणसाने वाहनातील सर्व खजुर दुसऱ्या वाहनात टाकुन पोबारा केला व फसवणुक केली अशी तक्रार पोलिसात दिली आहे. त्यावरुन अज्ञात आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.