नारंगी धरणात पाणी येणार ,पालखेड डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी 33 कोटी 65 लक्ष रुपये मंजूर

जफर ए.खान 

वैजापूर ,१ डिसेंबर:-राज्य शासनाने नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या पालखेड धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 33 कोटी 65 लक्ष 69 हजार रुपये मंजूर केले असून, या कामाची निविदा काढण्यात आली आहे. कालव्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणामुळे नारंगी धरणात पाणी येण्यासाठी निर्माण होणारे अडथडे दूर होऊन वैजापूर शहर व आसपासच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.
वैजापूर शहरालगत नारंगी धरण बांधण्यात आलेले असून, नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी (अतिरिक्त पाणी) वैजापूर शहराला पिण्यासाठी नारंगी धरणात सोडण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे त्यानुसार पालखेड धरणाचे अतिरिक्त पाणी डाव्या कालव्याद्वारे नारंगी धरणात सोडण्यात येते.येवला-अंदरसुलमार्गे नारंगी धरणात येणाऱ्या या पाण्यामुळे वैजापूर शहरासह आसपासच्या आठ-दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटतो. मात्र अंदरसुल गावापासून वैजापूरपर्यंत हा कालवा बुजलेला असल्याने नारंगी धरणात पालखेड धरणाचे पाणी येण्यात अडथडे निर्माण होऊन या कालव्याच्या पाण्यापासून वैजपुरकरांना वंचित राहावे लागते.
पालखेड डाव्या कालव्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात यावे अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती. वैजापूर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी या प्रश्नात लक्ष घातले व  यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. राज्य शासनाने पालखेड डाव्या कालव्याच्या कि.मी. 85 ते 128.5 कि.मी.मधील दुरुस्ती व रुंदीकरण कामास मंजुरी दिली असून, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या कामाची निविदा ही काढली आहे. या कामाची अंदाजित रक्कम 33 कोटी 65 लक्ष 69 हजार एवढी असून 15 डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.पालखेड धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती व रुंदीकरण झाल्यास नारंगी धरणात पाणीसाठा उपलब्ध होऊन वैजापूर शहर व आसपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.असे मा. नगराध्यक्ष साबेरखान यांनी यासंदर्भात बोलतांना सांगितले.