ॲट्रॉसिटीप्रकरणी जयश्री बोरणारेंना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

Displaying IMG_20220306_195722.jpg

वैजापूर ,६ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे मारहाण प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादीनंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाणा) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व पंधरा हजार रुपयांवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना सध्यातरी अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे‌.       

आमदार रमेश बोरनारे व त्यांच्या चुलत भावजयी जयश्री दिलीप बोरनारे यांच्यातील मारहाण प्रकरण वैजापूर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. जयश्री बोरनारे यांच्या तक्रारीनंतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदारांच्या  स्वीय सचिवाने जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप करून जयश्री बोरनारे यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्याआधारे त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या गायब होत्या. अटक टाळण्यासाठी त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज वैजापूर न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. किशोर गाढवे पाटील यांच्यामार्फत अपील दाखल केले होते. यात राज्य सरकारसह इतरांना प्रतिवादी करण्यात आले आहे‌‌.

या अपीलावर न्या.आर.जे.अवचट यांच्या न्यायालयात तीन मार्च रोजी सुनावणी झाली. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून याबाबत 17 मार्चपर्यंत स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणीपर्यंत या प्रकरणातील आरोपीस अटक झाल्यास त्यांची पंधरा हजार रुपयांचा जात मुचलका (पीआर बॉन्ड) व तितक्याच किमतीच्या जामीनावर सुटका करावी. असे आदेश न्यायालयाने पारित केले. अर्जदाराने याप्रकरणातील पुराव्यांशी कुठल्याही प्रकारे छेडछाड करु नये व गरजेनुसार पोलिस ठाण्यात हजर रहावे. असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.