निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर,४ एप्रिल  /प्रतिनिधी :-राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याला एक ते पाच तारखे दरम्यान व्हावे यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करुन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी दिले.

येथील मौलाना आझाद शाळेत रविवारी घेण्यात आलेल्या पेन्शनरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले, दिवंगत हरिश्चंद्र जोशी यांना अभिवादन करण्यात आले.

पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत, जिल्हाध्यक्ष वसंत सबनीस, डॉ.अरविंद देशमुख, जनार्दन अमृतकर, एन.ए. घुगे, पी.टी.कुलकर्णी, पी.डी. शेटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्यांची रक्कम एका वेळी मिळावी अशी निवृतीवेतनधारकांची मागणी आहे. तसेच निवृत्ती वेतन धारकांना विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उद्धट वागणुक देत असल्याच्या तक्रारी झाल्याने ही बाब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकणार असुन निवृत्तीवेतनधारकांना सन्मानाची वागणुक मिळावी यासाठी परिपत्रक काढण्याबाबत शासनाला विनंती करणार असल्याचे आमदार बोरनारे यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन एक तारखेला मिळावे यासाठी पालिका अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनीही निवृत्ती वेतन धारकांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे उत्तमराव साळुंके, अण्णा साहेब शेळके, अशोक पवार, सी.आर.नरोडे, मीरा खैरमोडे, मुख्याध्यापक जी.जी.राजपूत, के.एस. सोनवणे, बी.बी.बाविस्कर, गंगापूरचे के.ए. खाजेकर, सोपान निकम, पी.एन. पोटे, निवृत्त तहसीलदार भगवानसिंह राजपूत, सुरेश संत, पी.बी.त्रिभुवन उपस्थित होते.