नांदूर- मधमेश्वर कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळला

वैजापूर,४ एप्रिल  /प्रतिनिधी :- दोन दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह नांदुर मधमेश्वर कालव्याच्या पाटात आढळुन आला. योगेश नाथा कर्डिले (वय 23) असे त्यांचे नाव असून तो तालुक्यातील सिरसगाव येथील राहणारा होता. ही आत्महत्या आहे की घातपाताचा प्रकार याबाबत पोलिस तपास करत आहेत.

मृताच्या शरीरावर कुठल्याही खुणा अथवा जखमा आढळुन आल्या नाहीत. योगेश हा सिरसगाव येथील रहिवासी असून त्याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय होता. शुक्रवारी सायंकाळी तो घरी बाहेर जातो असे सांगून निघाला. मात्र दुसऱ्या दिवशीही तो परत न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली.

रविवारी (ता.3) हनुमंतगाव शिवारात साहेबराव नांगरे यांच्या शेत गट क्रमांक 63 मधील पाटाजवळ एक दुचाकी, मोबाईल व चावी आढळून आली. योगेश याचा मृतदेह कालव्यात पाण्यासोबत वाहून जाताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गणेश पंढुरे, पोलिस पाटील सुधाकर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला.

वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिस पाटील शेळके यांनी दिलेल्या माहितीवरुन विरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन हेड कॉन्स्टेबल पंढुरे हे अधिक तपास करीत आहेत.