अखिल भारतीय संमेलन औचित्यहिन झाल्याने ते बंद करावे-गणेश विसपुते यांचे प्रतिपादन

16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विसपुते यांचे नागरी सत्काराला उत्तर

★राष्ट्रवाद ही मानवता विरोधी,अविश्वसनीय व कालबाह्य संकल्पना
★ सांस्कृतिक राष्ट्रवाद हा फँसिझम पेक्षाही विघातक


औरंगाबाद,४ एप्रिल / प्रतिनिधी :-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दक्षिणा उकळण्यासाठी ऊभे राहिलेले संमेलन आहे.  या संमेलनाच्या प्रत्येक शब्दापुढे प्रश्न चिन्ह आहे. ते अप्रस्तुत,औचित्यहिन ठरल्याने बंद करणे उचित राहील असे परखड प्रतिपादन सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी,अनुवादक गणेश विसपुते यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ व श्री. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नँशनल कमिटी दिल्ली विद्यमाने उदगीर येथे होणाऱ्या 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांचा संत मिरा हायस्कूलच्या प्रांगणात  कवियत्री प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या हस्ते नागरी सत्कार  करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना विसपुते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,आज अखिल भारतीय म्हणवले जाणारे साहित्य संमेलनाचे नाव पुर्वी ग्रंथकार सभा  होते.त्यात विशिष्ट जातीचेच अध्यक्ष निवडत.पुढे काकासाहेब गाडगीळ केंद्रात मंत्री झाले. साहित्य संमेलनाला आर्थिक मदत मिळावी असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवल्यावर हे मर्यादित, प्रादेशिक संमेलन असल्याने मदत देता येत नाही असे गाडगीळ म्हणाले. तेव्हा याचे नामकरण अखिल भारतीय करण्यात आले. या प्रत्येक अक्षरापुढे प्रश्न चिन्हं आहे. दक्षिणा उकळण्यासाठी ऊभ्या केलेल्या या कार्यकर्मातून ठोस काही होत नाही.ते बंद करून छोटे, छोटे संमेलनं घ्यावीत, गावोगावी वाचनालये ऊभारावीत व सामान्य माणसांच्या जिवन मरणाच्या प्रश्नांशी साहित्याने संवादी व्हावे. आज राष्टवादाचा,धर्माचा उन्माद निर्माण करण्यात आला आहे. राष्ट्रवाद हा मानवतेच्या विरोधात आहे. रविंद्रनाथ टागोरांनीही हाच मुद्दा मांडला पण तो पुढे येऊ दिला नाही. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा फँसिझमपेक्षाही विघातक आहे. कवी,लेखकांनी नेहमी सत्तेच्या विरोधी बाकावर बसावे तरच तो सत्याशी प्रामाणिक राहतो. असत्याच्या विरोधात सत्याने ऊभे राहणे म्हणजे विद्रोह. ही भूमिका विद्रोहाची आहे. असे सांगून औरंगाबाद शहर हे विविध धर्म, संस्कृती जपणारं,अवलियांचे शहर आहे. गालिबचा गुरू येथे राहत होता अशा आठवणी सांगताना विसपुते भाऊक झाले.

यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. प्रतिभा अहिरे म्हणाल्या की, प्रस्थापित साहित्य संमेलन हे शोषणाच्या विरोधात बोलत नाही, भूमिका घेत नाही तर समर्थन करते. विद्रोही साहित्य संमेलन हे जोतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक प्रेरणा घेऊन वाटचाल करत आहे.शोषणाला आडवे करूनच समतेला ऊभे रहावे लागते.

प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की,विद्रोही साहित्य संमेलन होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणण्यात येत आहे.परशुराम आणि नथुरामाचे गौरविकरण करणार्या अखिल भारतीय वाल्यांचा प्रतिवाद आम्ही करणारच आहोत. टोकाला जाल तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंडपातच विद्रोही साहित्य संमेलन भरवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील होते.ते म्हणाले मानवतेच्या बाजूने लेखकांनीच नव्हे तर  सर्वांनी ठामपणे ऊभे रहावे. समता, न्याय ,बंधुता ही मूल्ये जपण्यासाठी  संघटित व्हावे. यावेळी व्यासपीठावर डॉ. सिताराम जाधव,किशोर ढमाले यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमास अनंत भवरे, प्रा.राहूल कोसंबी,प्रा.उमेश बगाडे,मंगल खिंवंसरा,के.ई. हरदास, प्रा.राम बाहेती,कॉम्रेड भीमराव बन्सोड, अँड.भगवान भोजने,प्रा.आदिनाथ इंगोले, लोकेश कांबळे,मधुकर खिल्लारे,मेघा इंगोले,जब्बार पटेल,ऋग्वेद पाटील ,प्राचार्य पंडित गडकरी, भारत जमधडे,प्रा.रेखा मेश्राम, किशोर उघडे, महेश ढाकणे,प्रा.भारत सिरसाठ, आकाश लोणकर, अरविंद चक्रनारायण,अशोक ऐंगडे,आदिंसह मोठ्या संख्येने विविध परिवर्तनवादी सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.वसुधा कल्याणकर यांनी सावित्रीबाई फुल्यांची क्रांतिगिते सादर केली.सुत्रसंचालन भारत काळे यांनी केले.आभार राजानंद सुरडकर यांनी मानले.