वैजापूर न्यायालयात 6 नोव्हेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती मोहीम – जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन यांची माहिती

वैजापूर, ३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पॅन इंडिया अंतर्गत जिल्हा विधी समिती व वकील संघाच्यावतीने 6 नोव्हेंबर रोजी वैजापूर न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मोहीम आयोजित करण्यात येणार असून याच कार्यक्रमात शहरातील विविध शासकीय कार्यालयातर्गंत असलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी दिली. 

न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने जनतेमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने मोहीम राबवण्याची सूचना दिली असून देशात 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वैजापूर येथे 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए., न्यायाधीश फडणवीस, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शन तर करण्यात येणार आहेच. याशिवाय कृषी विभागासह पंचायत समिती, बँक, महावितरण, तहसील, वनविभाग व अन्य विविध शासकीय कार्यालयांमार्फत नागरिकांसाठी सुरू असलेल्या शेतीविषयक, वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. एकाच छताखाली शहरातील शासकीय कार्यालयप्रमुखांना बोलाविण्यात येऊन सविस्तर माहिती दिली जाणार असून प्रत्येक कार्यालयांचे स्वतंत्र स्टाॅल लावून प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, पोलिस पाटील,  तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात शासनाच्या योजनेच्या लाभ घेण्यासाठी नागरिकांचे अर्जही भरून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन न्यायाधीश एम.मोहियोद्दीन एम. ए. यांनी केले आहे. याप्रसंगी तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ,  प्राचार्य संजय चव्हाण आदी उपस्थित होते.