पोलिसांशी अरेरावी करुन धक्काबुक्की:पिता-पुत्रास अटक

औरंगाबाद,३ एप्रिल / प्रतिनिधी :-गुन्‍ह्याचा पंचनामा करण्‍यासाठी गेलेल्या पोलिसांशी अरेरावी करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी दि.२ एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्‍या सुमारास उस्मानपुऱ्यातील   साठे चौकात घडला. विशेष म्हणजे पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे यांच्‍या समोरच हा प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गुन्‍हा दाखल करुन अरेरावी करणाऱ्या पिता-पुत्राला अटक केली.गुरुबचन खैरुराम सिरसवाल (५१) आणि दौलत गुरुबचन सिरसवाल (३०, दोघे रा. छोटामुरलीधर नगर, उस्‍मानपुरा) अशी अटक पिता-पुत्राची नावे आहेत.

या प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍याचे अंमलदार चंद्रकांत कचरु चंदेल (३५) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, कार चालकाला मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात उस्‍मानपुरा ठाण्‍याचे पोलीस व झोन दोन चे उपायुक्त दिपक गिर्हे हे आरोपी करमविर चौव्‍हाण याला घेवून घटनास्‍थळी पंचनामा करण्‍यासाठी गेले होते. त्‍यावेळी आरोपी गुरुबचन सिरसवाल हा तेथे आला व कार चालकाला मारहाण प्ररकणी तुम्ही करमविर याला का अटक केली आहे, त्‍याला सोडून द्या असे म्हणत उस्‍मानपुरा ठाण्‍याचे निरीक्षक बागवडे यांच्‍याशी वाद घालू लागला. त्‍यावेळी तेथे उपस्थित पोलीस त्‍याला समजविण्‍यासाठी गेले असता त्‍याने फिर्यादी चंदेल यांना धक्का दिला व आरोपीला नेवू देणार नाही असे म्हणत पोलिसांसमोर थांबला. त्‍याच वेळी आरोपीचा मुलगा दौलत सिरसवाल हा तेथे आला, त्‍याने माझे वडील जसे म्हणतात, तसे करा अन्‍यथा वस्‍तीतील लोकांना जमा करु असे म्हणत फिर्यादीशी धक्काबुक्की करुन झटापट केली. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राला आज रविवारी दि.३ एप्रिल रोजी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी आरोपी पिता-पुत्राची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍याचे आदेश दिले.