मोबाइल टॉवरमधील बॅटरी सेल चोरुन नेणाऱ्या एकाला बेड्या

औरंगाबाद,३ एप्रिल / प्रतिनिधी :- ईन्‍डस कंपनीने बसवलेल्या मोबाइल टॉवरमधील २४ हजार रुपये किंमतीचे २४ बॅटरी सेल चोरुन नेणाऱ्या एकाला हर्सुल पोलिसांनी शनिवारी दि.२ एप्रिल रोजी रात्री बेड्या ठोकल्या. शेख कलीम शेख ईस्‍माईल (२४, रा. जुना मोंढ, रेंगटीपुरा) असे चोरट्याचे नाव असून त्‍याला सोमवार दि.४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी रविवारी दिले.

प्रकरणात पुण्‍यातील निशा ग्रुप कंपनीचे पेट्रोलिंग सुपरवायझर योगेश भागवत सोनुने (२३, रा. देऊळगाव माळी ता. मेहकर जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली. निशा ग्रुप कंपनीच्‍या वतीने ईन्‍डस कंपनी विविध मोबाइल टॉवरचे देखरेखीचे काम करते. फिर्यादी हा पेट्रोलिंगकरुन टॉवरची देखभालीचे काम करतो. ईन्‍डस कपंनीने हर्सुल शिवारात हरणे यांच्या शेतात भाडे तत्वावर आयडीयाचे मोबाइल टॉवर बसवले आहे. ७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने टॉवरची पाहणी केली तेंव्‍हा टॉवरच्‍या बॅटरी रॅकमध्‍ये सर्व बॅटरी सेल व्‍यवस्थीत होते. ९ फेब्रुवारी रोजी फिर्यादीचा सहकारी मनोज परदेशी हे टॉवरच्‍या जनरेटरमध्‍ये डिझेल टाकण्‍यासाठी गेले असता टॉवरच्‍या बॅटरी रॅकमधुन २४ बॅटरी सेल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, गुन्‍ह्यातील मुद्देमाल हस्‍तगत करायचा आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचातपास करायचा आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी न्‍यायालयाकडे केली.