औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीचे काम तत्परतेने करावे– जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१० जून /प्रतिनिधी:-  चिकलठाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठीच्या जागेवर तत्परतेने हद्द खुणा करून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आ. हरीभाऊ बागडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भगत, डॉ. उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Displaying IMG_20210610_154645.jpg

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी क्रीडा संकुलाच्या जागेवर तातडीने संरक्षक भिंत उभारून जागा संरक्षित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअर घ्यावी. तसेच त्या ठिकाणी इनडोअर गेम हॉल, संकुलाकडे येणाऱ्या रस्त्याचे बळकटीकरण करून अंतर्गत बांधकाम सुरू करावे, असे निर्देशित केले. तसेच संकुलाच्या जागेच्या हद्दीत असलेला पाझर तलाव विकसित करून त्या ठिकाणी साहसी जलक्रीडा प्रकार तसेच गोल्फची सुविधा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावयाच्या सूचना दिल्या.

आ. श्री. बागडे यांनी संकुलाच्या जागेचा सुव्यवस्थित वापर होण्याच्या अनुषंगाने सर्व बांधकाम हे सुनियोजितपणे करावे. वृक्षरोपणासह त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात क्रिकेट, हॉलीबॉल यासारख्या खेळांसाठीची धावपट्टी शेड या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून स्थानिक खेळाडू, युवकांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी जागा उपलब्ध होईल, असे सूचित केले.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाच्या निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यास तसेच कंत्राटदारास मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.