ग्रामपंचायत महिला सदस्याला सुमारे पावणेआठ लाखांना गंडा: पोलिसांनी एका आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,१ एप्रिल / प्रतिनिधी :-शिलाई मशिनसह पिकोफॉलची मशीन तसेच ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल व इतर वस्तू ट्रस्टच्या माध्यमातून सवलतीच्या दरात देण्याचे आमिष दाखवून ग्रामपंचायत महिला सदस्याला सुमारे पावणेआठ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी शुक्रवारी दि.१ एप्रिल पहाटे एका आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या.सुनिल देवराव पाईकराव (३२, रा. भविष्‍यदिप नगर, सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) असे आरोपीचे नाव असून त्‍याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.व्‍ही. खेडकर/गरड यांनी दिले.

वाळूज भागातील तिसगाव ग्रामपंचायत सदस्या रेखा सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, रेखा सुर्यवंशी यांची त्यांच्या मैत्रिणीच्या परिचयातील आरोपी सुनील पाईकराव याच्याशी ओळख झाली. या भामट्यांने त्याच्या न्यु इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून गरिब, होतकरू महिलांना अनुदान तत्वावर शिलाई मशीन, पिठाची गिरणी, मोबाईल, पिकोफाँल मशीन, पेन्शन योजना आदी विविध प्रकारच्या योजना राबवू, त्‍यासाठी महिलांचे गट बनवून पैसे जमा करा सुर्यवंशी यांना सांगितले. त्‍यानूसार, सुर्यवंशी यांनी शेकडो महिला-विद्यार्थ्यांकडून पैसे जमा केले व ते पैसे भांमट्या पाईकरावला दिले. त्यानंतर या भामट्यांने महिलांचे मन जिंकण्यासाठी शिलाई मशिनचे हेड व मोबाईल असे सुमारे साडेसहा लाखांचे साहित्य वाटप केले. मात्र उर्वरित सात लाख ७३ हजार रुपयांचे साहित्‍य न घेता ते पैसे लंपास केले. सुर्यवंशी यांनी वेळोवेळी साहित्य आणि पैशाची मागणी केली. मात्र त्याने प्रत्येकवेळी भुलथापा मारून वेळ मारून नेली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपीला गुन्‍हा करण्‍यासाठी कोणी सहकार्य केले काय याचा तपास करायचा आहे. तसेच आरोपीच्‍या न्‍यु इंडिया फाउंडेशन ट्रस्‍ट बाबत देखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.