बदलत्या तंत्रज्ञानाची चाहूल ओळखून उच्च शिक्षणामध्ये अद्यावतीकरण करणे आवश्यक-डॉ. निपूण विनायक

नांदेड ,१ एप्रिल /प्रतिनिधी :-झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि मानव संसाधनाची जागतिक बाजारपेठेची वाढती अत्याधुनिक कौशल्ययुक्त मागणीमुळे उच्च शिक्षणामध्ये अद्यावतीकरण करणे आता आवश्यक झाले आहे. असे मत मुंबई येथील महाराष्ट्र राज्य फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीचे संचालक डॉ. निपूण विनायक यांनी व्यक्त केले आहे. 

ते दि. १ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी आणि RUSA-रुसा (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, रुसाचे नोडल अधिकारी प्रोफेसर पी.एन. पाबरेकर, नांदेड येथील सहसंचालक विठ्ठल मोरे, औरंगाबाद येथील तंत्रज्ञान शिक्षणाचे सहसंचालक डॉ. निलेश नागदिवे आणि रुसाच्या समन्वयिका डॉ. वाणी लातुरकर यांची उपस्थिती होती. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये पुढे डॉ. निपूण विनायक म्हणाले, उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्रामधून बुद्धिमान व वैज्ञानिकदृष्ट्या कुशल मानव संसाधनासाठी मोठी मागणी आहे. पण आपल्याकडे शिक्षकांना प्रशिक्षणाच्या मर्यादित संधी असल्यामुळे अध्यापनात फारसे परिणाम दिसून येत नाहीत. विशेष बाब म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि बाजारपेठेतील मागणी यामधील वाढती तफावत हे आजच्या उच्च शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. या सर्व बाबींचा विचार केला असता आपले विद्यार्थी आणि शिक्षण पद्धती कुठेतरी कमी पडत आहे. असे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची योजना आखली आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील उच्च शिक्षणातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवड करणे. या प्रशिक्षितांनी पुढे जाऊन आपल्या जिल्ह्यामधील सर्व उच्च महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे असे नियोजन आहे. या प्रशिक्षणामार्फत शिक्षकांमध्ये व्यवसायिकता, सक्षमता आणि सखोल वचनबद्धता निर्माण होण्यासाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देऊन कुशल बुद्धिमान नविन पिढी घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्य फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीची स्थापना केलेली आहे. 

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आपल्या अध्यक्ष समारोपात आपले विचार मांडले ते म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी अगोदर शिक्षकांना स्वत:चा सर्वांगीण विकास साधने आवश्यक आहे. त्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील कमीत-कमी दहा शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुसाच्या समन्वयिका डॉ. वाणी लातूरकर यांनी केले.