‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे – मंत्री दीपक केसरकर

अभियानातील विजेत्या शाळांना मुख्यमंत्री भेट देणार

मुंबई,२ जानेवारी / प्रतिनिधी :-राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यातील सर्व शाळा सहभागी होत आहेत. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन शाळांना मुख्यमंत्री स्वत: भेट देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आपली शाळा – सुंदर शाळा ठरावी यासाठी या अभियानात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे उद्घाटन 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप डांगे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहसचिव इम्तियाज काझी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून सुमारे दोन कोटी विद्यार्थी या पत्राचे आपल्या पालकांसमोर वाचन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व्यवस्थेतून आलेल्या अनुभवांवर आधारित घोषवाक्य लिहून अपलोड केले जाणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची निवड करून विजेत्यांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा तीन स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे; क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे; राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे; राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे; विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे; त्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्त्वाचे जडणघडण करणे तसेच शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप

अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनामध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसर स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन (देशी खेळांना प्राधान्य), त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांच्या सहभागासाठी गुणांकन दिले जाणार आहे.

पारितोषिके

राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी वर्गवारी निहाय प्रत्येकी 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 21 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 11 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील दोन्ही वर्गवारीमध्ये स्वतंत्ररित्या पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.