जालना तहसीलच्या प्रवेशद्वारात स्वस्त धान्य दुकानदारांचा अडीच तास ठिय्या

 4 जी च्या मशीन द्या घोषणाबाजी 

तहसीलदारांनी स्विकारले निवेदन 

जालना,१ एप्रिल / प्रतिनिधी :- धान्य वाटपात अडचणी येत असलेल्या 2 जी च्या इ- पॉस मशीन जमा करून 4 जी च्या मशीन द्याव्यात, गुत्तेदाराने वेळेवर धान्य पुरवठा करावा या सह प्रलंबित मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. संघटनेचे राज्य सचिव विजयकुमार पंडित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.01) जालना तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अडीच तास ठिय्या दिला.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा विजय असो,,, जून्या मशीन बदलून द्या…, वेळेवर धान्य मिळालेच पाहिजे…, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसीलदार भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. 
एन.आय.सी. व आधार चे वारंवार होणारे सर्वर डाऊन,जून्या मशीन मुळे धान्य वाटपात अडचणी निर्माण होत असून विस्कळीत रेशनिंग व्यवस्थेमुळे शिधापत्रिका धारकांचा रोष वाढत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व तहसीलमध्ये इ- पॉस मशीन जमा करण्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला. त्या अनुषंगाने सकाळी 11.00 वा. शहर व ग्रामीण भागातील दुकानदार मशीन जमा करण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात एकञ आले.

लक्ष्मी दर्शन मुळे धान्य उशिरा मिळते : पंडित 
फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात चलन भरून ही मार्च संपला तरीही काही दुकानदारांना धान्य मिळाले नाही. तर काही ठिकाणी जानेवारी चा धान्य पुरवठा झाला नाही  तसेच प्रधानमंत्री मोफत धान्य योजनांचे धान्य अर्धवट मिळाले असून प्रशासन गुत्तेदारावर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करत आहे. असा आरोप विजयकुमार पंडित यांनी केला. लक्ष्मी दर्शन होताच धान्य उशिरा मिळते अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रधान सचिवांसोबत नोव्हेंबर मध्ये बैठक झाली. मात्र दुकानदारांच्या अडचणींबाबत शासन व प्रशासन गंभीर नसल्याने शिधापत्रिका धारकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याचे विजयकुमार पंडित यांनी सांगितले. 

तहसीलदार जिल्हा कचेरीत व्ही. सी. मध्ये व्यस्त असल्याने दुकानदारांनी अडीच तास प्रवेशद्वारा समोर ठिय्या दिला. आंदोलना दरम्यान ना. त. मंगल मोरे यांनी भेट दिली. मात्र मशीन जमा करण्याचे आदेश नसल्याचे सांगत त्यांनी मशीन घेण्यास नकार दिला. तहसीलदार भुजबळ यांनी भेट देत मशीन ऐवजी निवेदन स्विकारले. सतत सर्वर डाऊन, रेंज मिळत नसल्याने 2 – जी चे सिमकार्ड काम करत नाही. आदी तक्रारींमूळे नवीन मशीन द्याव्यात अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या वेळी राज्य सचिव विजयकुमार पंडित, राज्य सदस्य क्रांती खंबायतकर, शहराध्यक्ष मनीत कक्कड, सचिव संकेत पाटील, नारायण काळे, रामप्रसाद काळे, भगवान खरात,ज्ञानेश्वर शेजुळ, गणेश गुल्लापेल्ली, राम शहाणे, फकीर महम्मद, उत्तम वाहुळे, अशोक घोडे, यु .ए. देसरडा,  सुशील सोनुने,ज्योती उगले, जया अग्रवाल,रवी जयस्वाल यांच्या सह शहर व ग्रामीण भागातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.