प्रधानमंत्री आवास योजनेतील  डीपीआरला केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन समितीची मान्यता 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या प्रयत्नाला यश

गोरगरिबांना आता शहरांमध्ये हक्काचे घरकुल मिळणार

औरंगाबाद ,३० मार्च /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतील घटक क्रमांक तीन आणि चार मधील तब्बल 39860  हजार घरकुलाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन समितीची मान्यता मिळाली असून, लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या शुभहस्ते या घरकुलाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय घरे आणि शहरी विकास विभागाची केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन समितीची साठावी बैठक झाली, या बैठकीमध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या घरकुल योजनेच्या डीपीआरला मान्यता देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरामध्ये गेल्या सहा वर्षांपासून रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना ,आता लवकरच पूर्ण होणार आहे. गत आठवड्यामध्ये राज्य शासनाने घरकुलाचा डीपीआर नवी दिल्ली मध्ये केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन  समितीकडे 39 हजार घरकुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, केंद्रीय समितीने हा अहवाल स्वीकारला नाही.त्यानंतर ,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी तत्काळ केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन समितीची नवी दिल्लीमध्ये बैठक घेऊन, औरंगाबाद शहरातील महानगरपा घरकुल डीपीआर स्वीकारावा या संदर्भात सूचना त्यांनी केल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंजुरी आणि मूल्यमापन समितीने आता औरंगाबाद शहरातील 39860 घराचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरी दिली आहे. या घरकुलासाठी किमान चार हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.अनेक गोरगरिबांना आता शहरांमध्ये हक्काचे घरकुल मिळणार आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रधानमंत्री आवास योजने बाबत पत्रव्यवहार केला होता तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील त्यांनी औरंगाबाद शहरातील घरकुल योजनेसाठी शहरालगत असलेले तिसगाव येथील  जमीन देण्यासंदर्भात मागणी केली होती त्यानंतर राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण करण्यासाठी तात्काळ महानगरपालिकेला शंभर एकर जमीन उपलब्ध करून दिली.
आता प्रधानमंत्री आवास योजनेतील डीपीआरला मंजुरी मिळाली असून, लवकरच या योजनेचे शुभारंभ  करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री तथा शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी हे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत.
 आठवड्यामध्ये डीपीआरला मान्यता देण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मंजुरी आणि मूल्यमापन समितीचे सचिव मनोज जोशी ,कुलदीप नारायण, सर्वांसाठी घरे उपसंचालक संजय कुमार बब्बर यांच्याशी बैठक घेऊन औरंगाबाद महानगरपालिकेच्या डीपीआरला मान्यता देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यावेळी त्यांनी शहरांमध्ये एकही घरकुल नामंजूर होणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात सूचनाही समितीच्या सदस्यांना केल्या होत्या त्यामुळे आता औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील डीपीआरला मान्यता मिळाली आहे.ही मान्यता मिळवण्यासाठी मिलिंद म्हैसकर ,अनिल डिग्गीकर, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही सहकार्य केले.