पंडित नाथराव नेरलकर यांचे निधन,मराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला

औरंगाबाद : संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरळकर यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पं.नेरळकर यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या निधनाने  मराठवाड्याच्या संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  

पं. नेरळकर यांना अतिशय मानाच्या अशा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने २०१४ मध्ये सन्मानीत केल्या गेले होते.

गानमहर्षी डाॅ. आण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी बालपणापासून नांदेड येथे गायनाचे धडे गिरवले.नाथराव नेरळकर यांचा जन्म नांदेड येथे २० नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. मराठवाड्यात संगीताचा प्रसार मोठ्या प्रमाणात करणारे नाथराव यांचे वडील गणपतीशास्त्री हे पौरोहित्य करत होते. नाथरावांचे काका धोंडोपंत यांना असलेल्या संगीताच्या आवडीमुळे नाथरावांचा संगीत क्षेत्रात प्रवेश झाला. धोंडोपंत हे मराठवाड्यातील गायनाचार्य अशी ओळख असलेल्या पंडित अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य होते. धोंडोपंत यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कृष्णनाथ सुद्धा १९४७ पासून गुंजकरांच्या संगीत शाळेत गायन शिकू लागले. लवकरच त्यांनी गायनात प्राविण्य मिळवले. १९५७ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत विशारद’ ही पदवी त्यांना ‘विष्णू दिगंबर पारितोषिका’ सह मिळाली. 


१९५८ ला त्यांची “अनंत संगीत महाविद्यालय” ची स्थापना केली. त्या माध्यमांतून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे संगीत अध्यापनाचे काम चालू होते.सरस्वती भुवन महाविद्यालयात त्यांनी संगीत विभाग प्रमुख म्हणून मोलाचे कार्य केले.कोलकोत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीत गुरूपदी त्यांची नियुक्ती सन्मानपूर्वक करण्यात आली होती.राज्यात व देशभरात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते.नाथरावांनी मराठवाडय़ात तब्बल सहा दशकांहून अधिक काळ संगीत साधना केली. आपल्या अवीट स्वरांनी मराठवाडय़ाचे संगीत क्षेत्र समृद्ध केले. मराठवाडय़ाच्या अस्सल मातीतील हे कलंदर व्यक्तिमत्त्व आपल्या संगीत शिक्षण आणि प्रसारात सक्रिय आहे. वयाच्या ८१व्या वर्षीही नाथरावांच्या मैफली दमदारपणे रंगतात. अत्यंत मितभाषी स्वभाव ही जमेची बाजू असल्याने जसा शिष्य परिवार वाढला तसा हितचिंतक, चाहते मित्र परिवारही वाढला.

संगीत मैफलींच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंत नांदेडला येत आणि मितभाषी नाथरावांच्या प्रेमात पडत. या मितभाषी स्वभावामुळे, साहित्य व संगीत क्षेत्रातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य राम शेवाळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, संगीतकार यशवंत देव, हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, पं. जसराज, बकुळ पंडित, सुरेश वाडकर, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा निर्माण झाला. नांदेडच्या वास्तव्यात नाथराव संगीत विशारद परीक्षेत देशभरात प्रथम आले आणि त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, उज्जैन येथील कालिदास संगीत महोत्सव, संभाजीनगरातील वेरुळ महोत्सव, नामधारी संगीत महोत्सवाच्या मैफली नाथरावांनी गाजवल्या. पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज या दोघांशी नाथरावांचा खूप जिव्हाळा. नांदेड सेडून ​औरंगाबादला ​ स्थायिक व्हावे असा या दोन दिग्गजांचा नाथरावांना प्रेमळ सल्ला होता. हो-नाही करीत तो नाथरावांनी मानला. ५ जुलै १९७३ रोजी प्रतिभा निकेतनमधील संगीत शिक्षकाची नोकरी सोडली आणि ​औरंगाबादेत ​ गोविंदभाईंनी त्यांना आपल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सामील करून घेतले.
 

मराठवाडा परिसरात विविध संगीत महोत्सवांच्या माध्यमांतून शास्त्रीय संगीत प्रसाराचे त्यांचे कार्य अतुलनीय असे राहिलेले आहे.
वयाची ८५ ओलांडली तरी त्यांची संगीत साधना अविरत चालू होती, त्यांनी विविध रागांतील अप्रतिम अशा जवळपास ५१ बंदिशींची रचना केली होती ज्या आजही त्यांचा शिष्यवर्ग व इतर मान्यवर गातात.मराठवाडा विद्यापीठात संगीत विभाग सुरु झाला तो केवळ नाथरावांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. नांदेड येथे अनंत संगीत विद्यालय व औरंगाबाद येथे हिंदुस्थानी संगीत विद्यालय त्यांनी सुरु केले व गुरुकुल पद्धतीने विद्यादान करीत शिष्यांचा सांभाळ केला. त्यांचे असंख्य शिष्य आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आहेत. नाथराव नेरळकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार-२०१४, श्रेष्ठ गायक-अभिनेता पुरस्कार (राज्य नाट्य महोत्सव-१९५७), कलादान पुरस्कार (महाराष्ट्र शासन-१९९८), उत्कृष्टता पुरस्कार (रोटरी क्लब-२००१), औरंगाबाद भूषण पुरस्कार (२००२) इत्यादी काही मानाच्या  पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 
पं. नेरळकर यांच्या पश्चात गायिका हेमा उपासनी- नेरळकर ही मुलगी, संगीतकार जयंत  व  माजी रणजी क्रिकेटपटू  अनंत  ही मुलं, सुना, जावाई, नातवंडं असा परिवार आहे.