कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वैजापुरात सर्वसामान्यांचे हाल

वैजापूर,२९ मार्च  /प्रतिनिधी :-विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयातील महसुल विभाग, महावितरण व बॅक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामकाजावर परिणाम होऊन सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाल्याचे चित्र सोमवारी वैजापूर शहरात पहायला मिळाले. 

महसुल विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, नायब तहसिलदराची पदे मंडळ अधिकारी संवर्गातून भरावीत या मागणीसाठी महसुल कर्मचारी संघटनेतर्फे मागील दोन दिवसांपासुन राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सोमवारीही महसुल कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. काही बॅकांनीही संपाचे हत्यार उगारल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी बॅकेत आलेल्या ग्राहकांची सोमवारी चांगलीच तारांबळ झाल्याचे बघायला मिळाले. दुसरीकडे, शासनाने महावितरण कंपनी, जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांनी चालवण्याचा घाट घातल्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने खासगीकरणाला विरोध दर्शवत मध्यरात्रीपासुन संप करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या वैजापूर शहर विभागातील सात अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान महावितरणच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेतल्याने येथील कामकाज जवळपास ठप्प झाले होते. 
महावितरणच्या वैजापूर शहर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारल्याने कार्यालयात सोमवारी शुकशुकाट होता.