वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिचरास तीन अज्ञात व्यक्तींकडून मारहाण

वैजापूर,२९मार्च /प्रतिनिधी :- येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कार्यरत ग्रंथालय परीचर गणेश उद्धव साठे (रा. शिवशंकर नगर) यांना तीन अज्ञात व्यक्तींनी अंगावर मिरचीची पुड टाकून लोखंडी पाईप व चाकूने मारहाण केली. या घटनेत ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गणेश साठे हे मागील वीस वर्षांपासुन वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात ग्रंथालय परीचर म्हणुन कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळी महाविद्यलयाचे कामकाज आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी दुचाकीवर ( एम.एच. 20 ई.व्ही. 3621) निघाले. त्यावेळी गेटच्या बाहेर जवळपास दोनशे फुट अंतरावर तीन अनोळखी व्यक्ती हातात लोखंडी पाईप व चाकू घेऊन उभे होते. त्यांनी साठे यांना थांबण्यास सांगितले. साठे यांनी आपली दुचाकी थांबवल्यानंतर मला का थांबवले असे विचारताच तुम्हाला काही नाही तुम्ही जा असे ते म्हणाले. त्यामुळे साठे यांनी दुचाकी सुरु करताच त्यांच्यातील एकाने साठे यांच्या अंगावर मिरची पुड फेकली व अन्य दोघांनी लोखंडी पाईप व चाकूने साठे यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात साठे यांच्या हाताला व पायाला मार लागला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक संतोष जाधव, बाबासाहेब म्हस्के व जितेंद्र पवार हे तिघे तातडीने मदतीसाठी धाऊन आले. त्यांना पाहताच अज्ञात मारेकऱ्यांनी येवल्याच्या दिशेने धुम ठोकली असे साठे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणी गणेश साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खोकड  हे पुढील तपास करीत आहेत.