वैजापूर येथे विद्यार्थ्यांना द्यावयाच्या कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

वैजापूर,२८ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर उपजिल्हा रुग्णालय व पालिकेच्या रुग्णालयात गेल्या आठ दिवसापासून “कोव्हक्सीन”लस उपलब्ध नसल्याने 50 ते 60 मुलं -मुली लसीविना परत जात आहेत. सोमवारी शहरातील 15 ते18 वयोगटातील जवळपास शंभर विद्यार्थी परत गेले. 

याबाबत जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय  अधीक्षक डॉ. गजाजन टारपे यांच्याशी संपर्क साधला असता संपूर्ण जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर श्री.राजपूत यांनी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याशी संपर्क साधून लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली तसेच उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनाही कोव्हक्सीन लस तुटवडा बाबत कल्पना देण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

18 वर्षापुढील वयोगटातील नागरिकही दुसऱ्या डोस पासून वंचित आहेत याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ कोव्हक्सीन लस उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील लसीकरण लक्ष्य गाठता येईल असे राजपूत यांनी सांगितले. जिल्हा लसीकरणात खूप मागे असण्याचे कारण लस उपलब्ध नसणे हे सुद्धा आहे. यासंदर्भात माहिती देताना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता निकाळे, परिचारिका निर्मला जाधव, अशोक गाडेकर, श्रीमती. सिरसाठ, दादा दळे यांनी सांगितले की, दररोज 50 – 60 विद्यार्थी लसीविना परत जात आहेत. कोव्हक्सीन लस उपलब्ध होताच लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.