वीज कामगारांच्या संपाला औरंगाबादमध्ये उदंड प्रतिसाद

औरंगाबाद,२८ मार्च /प्रतिनिधी :- २ महिन्यांपासून वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समितीतर्फे चालू असलेल्या आंदोलनाचे रूपांतर शेवटी दोन दिवसाच्या संपात झाले. औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रभर  सोमवारी (२८ मार्च) संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील विविध संघटनांचे हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले.    

औरंगाबाद प्रादेशिक व परिमंडळ कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे अविनाश चव्हाण, राजेंद्र राठोड, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे पांडुरंग पठाडे, बी.एल. वानखेडे, म.रा. वीज तांत्रिक कामगार युनियनचे आर.पी. थोरात, कैलास गौरकर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे प्रणेश सिरसाठ, अक्षय पाडसवान, महाराष्ट्र वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचे शिलरत्न साळवे, सुनील बनसोड, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेसचे (इंटक) अख्तर अली, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेचे सुधाकर जायभाये, नवनाथ पवार आदींसह कंत्राटी कामगार संघटनांचे शेकडो प्रतिनिधी सहभागी झाले होते.     

औरंगाबाद प्रादेशिक व परिमंडळ कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात वीज कर्मचाऱ्यांना संबोधित करताना तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन

वीज कर्मचाऱ्यांवर विधायक प्रभाव असणाऱ्या सर्व ३९ संघटना संपात सामील झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वीज निर्मिती ठप्प झाली होती. राज्य अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी अखेर सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेऊन चर्चा केली. उशिराने चर्चा करतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि संप मागे घेण्याची विनंती केली.
     याबाबत संघटना प्रतिनिधींनी एकमुखाने खाजगीकरण करणार नाही, असा लेखी करार वीज कामगार, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीसोबत करावा, जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, केंद्र सरकारचा सुधारित विद्युत कायदा २०२१ ला विरोध करावा, तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, सूत्रधारी कंपनीचे प्रस्तावित बदली धोरण रद्द करावे, चालू असलेले सर्वमान्य 514 क्रमांकाच्या प्रशासकीय परिपत्रकानुसार बदली धोरण असावे, कंत्राटी कामगार यांना किमान साठ वर्षापर्यंत नोकरीमध्ये संरक्षण द्यावे या मागण्याबाबत उद्या समक्ष चर्चा करून लेखी करार करावा, अशी मागणी ऊर्जामंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये कामगार संघटनांनी केली. उद्या परत २९ मार्च रोजी मुंबई येथे चर्चा केली जाईल, असे ऊर्जामंत्री यांनी सांगितले.

त्यानुसार संपाबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल. तूर्त संप चालूच राहील. जोपर्यंत संयुक्त संघर्ष समितीबरोबर अधिकृत लेखी स्वरूपात करार होत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी एकमताने घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. हा संप शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच व वीज उद्योग खासींकरणापासून वाचवण्यासाठी होत असल्याने सर्व वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने केले आहे. राज्यभर शांततेने व शिस्तीने सुरू असून वीजग्राहकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी कृती समिती घेत आहे.    

औरंगाबाद येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे, अध्यक्ष प्रवीण बागुल, वीज कामगार सेनेचे राज्य सचिव शिलरत्न साळवे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर सय्यद जहिरोद्दीन व संजय खाडे यांनी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीची भूमिका आंदोलकांसमोर विशद केली आणि हा संप मंगळवारीही यशस्वी करण्याचे आवाहन केले.