नेटवर्क कंपनीचे ४५ लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या आरोपीला बेड्या

औरंगाबाद ,२४ मार्च /प्रतिनिधी :-सेव्हन स्टार डिजीटल नेटवर्क कंपनीचा अॅडमीन पॅनलचा आयडी व पासवर्ड चोरुन कंपनीच्या ग्राहकांना सिस्टीममधून लॉग आऊट करुन कंपनीचे ४५ लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या आरोपीला बुधवारी दि.२३ रात्री सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मोहम्मद तलाह मोहम्मद अनिस (३२, रा. मजनुहिल, रशिदपुरा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला शुक्रवारपर्यंत दि.२५ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी गुरुवारी दि.२४ दिले. विशेष म्हणजे आरोपी हा कंपनीची फ्रॅन्चाइजी घेतलेल्‍या फिर्यादीचा पूर्व पाटर्नर आहे.

प्रकरणात मोहम्मद मोईनोद्दीन मोहम्मद कमरोद्दीन (३७, रा. बारी कॉलनी, रोशनगेट) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार मोहम्मद मोईनोद्दीन यांची शहरात सेवा नेटवर्क नावाने इंटरनेट, केबल टिव्ही आणि सीसीटीव्हीचा व्यवसाय आहे. त्‍यात आरोपी मोहम्मद तलाह हा पूर्वी भागीदार होता. मार्च २०२० मध्‍ये फिर्यादीने आरोपीला ५० टक्के भागीदारी देवून वेगळे केले व एकमेकांच्‍या कामकाजात हस्‍तक्षेप करणार नसल्याचा कारर केला. त्‍यानंतर फिर्यादीने मुंबई येथील सेव्हन स्टार डिजीटल नेटवर्क कंपनीची फ्रॅन्चाइजी घेतली आहे. या कंपनीच्या माध्यमातून केबल टिव्ही, डीटीएच पॅकेजेस, इंटरनेट ब्रॉड बँड सर्व्हिस, सीसीटीव्ही सेवेचा शहरात पुरवठा करण्याचे अधिकार विकत घेतले होते. कंपनीचे असंख्य ग्राहक आहेत.

दरम्यान, सायबर भामट्याने फिर्यादीच्या कंपनीच्या मुख्य अॅडमीन पॅनलचा आयडी, पासवर्ड चोरला. त्यानंतर त्याने कंपनीच्या तब्बल ६०० ग्राहकांना सिस्टिम मधुन लॉग आऊट करत सबस्क्रीपशन सोडण्यास उद्युक्त केले. त्यामुळे कंपनीचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपासादरम्यान गुन्‍ह्यात वापरण्‍यात आलेल्या आयपी अॅडरेस व मोबाइल वरुन सायबर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने गन्‍ह्यात वापरलेला मोबाइल देखील पोलिसांनी जप्‍त केला आहे. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीने कंपनीचा आयडी व पासवर्ड कोठुन प्राप्‍त केला याचा तपास तर गुन्‍ह्यात वापरण्‍यात आलेल्या इतर दोन मोबाइल धाराकांचा तपास करुन त्‍यांना अटक करायची असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.