दुभंगलेले १२ संसार पुन्हा जुळले

औरंगाबाद,१२ मार्च / प्रतिनिधी :- क्षुल्लक कारणांवरून झालेले समज-गैरसमज, पैशांचा तगादा, सासरच्यांकडून होणारा त्रास, अशा काही कारणांमुळे दुभंगलेले ४० पैकी १२ संसार शनिवारी दि.१२ मार्च रोजी पुन्हा जुळले. ही प्रकरणे कौटुंबीक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.

न्यायालयात एकूण ४० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात दोन्ही बाजूची २१ जोडपी हजर राहिली. त्‍यापैकी १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातील १२ प्रकरणांत समेट झाला असून असून दुभंगलेले संसार पुन्हा जुळवण्याच्या दृष्टीने मार्ग निघाला. १४ प्रकरणांमध्‍ये तडजोडीने निकाली निघाली. तर १९ प्रकरणांमध्‍ये पक्षकार गैरहजर राहिले.

राष्‍ट्रीय लोकअदालत प्रभारी प्रमुख न्यायाधीश आशिष अयातिच यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कौटूंबिक न्‍यायालयाच्‍या पॅनलवर तदर्थ न्‍यायाधीश ए.डी. लोखंडे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन तर समुपदेशक विधिज्ञ मिरा क्षीरसागर, रश्‍मी देशपांडे यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले. या लोक अदालतसाठी न्‍यायालयीन व्‍यवस्‍थापिका वंदना कोचर, प्रभारी प्रबंधक अनिल जाधव, अधिक्षक कल्याण पागिरे आणि कौटूंबिक न्‍यायालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.