उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी मुख्‍य आरोपीच्‍या पोलिस कोठडीत वाढ

औरंगाबाद,११ जून /प्रतिनिधी:- 

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी मुख्‍य आरोपी नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग (२४, रा. हतीयारी बिमनवान काशी चौक नालंदा बिहार) याच्‍या पोलिस कोठडीत १४ जूनपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी शुक्रवारी दि.११ दिले. गुन्ह्यात यापूर्वी चौघांना अटक करण्‍यात आली होती.

वाळुज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९, रा. सिडको वाळुज महानगर-१, प्लॉट क्र. १०, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात १ आॅगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या  गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशित  झाली होती. या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे 56 लाख 64 हजार 700 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नितीशकुमार याला पोलिसांनी आरोपीला २ जून रोजी झारखंड येथून अटक केली.

आरोपीच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपीला नविन सीमकार्ड व मोबाइल जप्‍त करुन ते कोठून मिळाले याबाबत तपास करणे आहे. आरोपी नितीश कुमार विरोधात दिल्‍ली, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात गुन्‍हे दाखल असून तो गुन्‍ह्यात फरार आहे. आरोपीने फिर्यादीला भारत पेट्रोलियम नावाचे कागदपत्र कसे तयार केले याचा तपास बाकी आहे. गुन्‍हा करताना वापरलेले खाते आणि सिमकार्ड विनय पंडितयाने पुरविल्याचे आरोपीने सांगितले असल्याने विनयपंडीलतला अटक करणे आहे. तसेच आरोपीच्‍या मोबाइल मध्‍ये ५०० हून अधिक लोकांची मोबाइल क्रमांक, ई मेल आयडी आणि एसबीआय बँकेची कागदपत्र सापडले आहेत. त्‍यामुळे आरोपीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत असल्याने आरोपीच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.