दीड हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्याला कोठडी

औरंगाबाद/प्रतिनिधी

तक्रारदाराचा जीपीएफ मंजूर करण्यासाठी शिफारस करून फाइल पुढे पाठवल्याचे बक्षिस म्हणून दोन हजाराची लाच मागून दीड हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्याला सोमवारपर्यंत दि.29 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी शनिवारी दि.27 दिले. मारोती पंढरीनाथ पडलवार (५४) असे लाचखोर अधिकार्याचे नाव असून तो जिल्हा परिषदेत सहायक प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहे.

या जिल्हा परिषदेतील एका 56 वर्षीय  कनिष्ठ लिपीकाने फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीचा जीपीएफ मंजूर करण्यासाठी शिफारस करुन फाईल पुढे पाठविल्याचे बक्षिस म्हणून पडलवार याने फिर्यादीकडून २४ मार्च रोजी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड हजार रुपयांची लाच घेण्याचे ठरले. फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला व पडलवार याला दीड हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दि.26 जागीच पकडले. प्रकरणात विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीच्या आवाज पंचानाम आणि आरोपीचे कार्यालयीन दस्ताऐवज जप्त करणे बाकी आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज देखील जप्त करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.