समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गाच्या नवनगरासाठी असलेल्या प्रस्तावित जागेतून स्वतःच्या मालकीचे गट वगळावेत या मागणीसाठी तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा यासह शेजारच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे व बाबतरे या गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी दोन्ही तालुक्याच्या सीमेवरील समृद्धी महामार्गावर साखळी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. 
यावेळी तहसीलदार राहुल गायकवाड यांनी आंदोलकांची भेट घेऊन येत्या दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले. तालुक्यातील लाखगंगा, बाबतरा, पुरणगाव व धोत्रे या गावातील जवळपास साडे चार हजार एकर जमीन समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित नवनगरांसाठी असल्याची अधिसुचना शासनाने काढल्यानंतर या जमीनीवर अवलंबून असणाऱ्या दोन हजार कुटुंबांनी आक्षेप घेत जमीन देण्यास नकार दिला असून सातशे शेतकऱ्यांनी प्रशासनाला लेखी कळवले आहे असे असतानाही प्रशासनाने सर्व आक्षेप निकाली काढून नवनगरांची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे नांदुर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात येणारीसाडे चार हजार एकर हातातून निसटण्याची शक्यता आहे असा आरोप यावेळी पंडित शिंदे या शेतकऱ्याने केला. त्याला मुकुंद चव्हाण, संजय चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, आण्णासाहेब राजगुरु, बाळासाहेब गांगड, बाबासाहेब पानसरे, जालिंदर गिधाड, जगन्नाथ मोरे, विठ्ठल तुरकणे, हरि ठोंबरे, संतोष बढे, काशिनाथ मुकिंद, नवनाथ गायकवाड, विलास शिंदे, बापुसाहेब धुमाळ आदी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.

हे सर्व शेतकरी कुटुंबियांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी नवनगरासाठी नकार दिला असतांनाही प्रशासकीय अधिकारी यातून आमचे गट काढीत नाहीत असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव व वैजापुरचे पीआय सम्राटसिंह राजपूत यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.