गांजाची साठवणूक करुन त्‍याची चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीला चार वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गांजाची साठवणूक करुन त्‍याची चोरटी विक्री करणारा आरोपी नितीन ऊर्फ विक्की प्रविण जाधव (२५, रा. जुने बसस्‍टॅण्‍ड कन्नड) याला चार वर्षे सक्तमजुरी आणि २० हजारांचा दंड ठोठावण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश टी.जी. मिटकरी यांनी दिले.

प्रकरणात कन्नड पोलीस ठाण्‍याचे तत्कालीन निरीक्षक शिवलाल कचरुलाल पुरभे (५३) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी हे ८ जुलै २०१६ रोजी दुपारी कर्तव्‍यावर होते. त्‍यावेळी कन्नड शहरतील जुना बस स्‍टॅण्‍ड परिसरात राहणारा नितीन ऊर्फ विक्की जाधव हा गांजाचा साठा करुन त्‍याची विक्री करित असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. माहिती आधारे फिर्यादी व त्‍यांच्‍या पथकाने आरोपी नितीन ऊर्फ विक्की जाधव याच्‍या घरावर छापा मारला. आरोपीच्‍या घरझडतीत पाच हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. प्रकरणात कन्‍नड शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्यात तपसा अधिकारी उपनिरीक्षक एस.जे. पवार यांनी न्‍यायालयता दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुर्यकांत सोनटक्के आणि सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी सात साक्षीतदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत, एनडीपीएस कायद्याच्‍या २० (ब) कलमाखाली चार वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोषीला अतिरिक्त एक महिन्‍याची सक्तमजुरी शिक्षा भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.