शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा- पद्माकरराव मुळे

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
६ जून १६७४ हा राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा मंगल दिवस. रायगडावर ६ जून रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम रयतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे झाले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले. शिवराज्याभिषेक दिवसानिमित्त श्री पद्माकरराव मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत झाले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर, डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. उल्हास शिंदे, प्रा गणेश डोंगरे, श्री. अशोक आहेर, श्री. राज तांबे, श्री. संजय वाळुंज पाटील आणि विभागप्रमुख हजर होते.