वैजापूर येथे गॅस केंद्र सुरू करण्यात यावे – भाजप कार्यकर्त्यांचे केंद्रीयमंत्री डॉ.कराड यांना निवेदन

वैजापूर ,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गावरुन नागपूर व मुंबईला जोडणाऱ्या गॅस पाइपलाईनचे काम सुरु आहे. महामार्गाजवळ असलेल्या वैजापूर येथे केंद्र केल्यास वैजापूर शहरातील वीस हजार कुटुंबांना पाईपलाईनद्वारे सहज स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होईल. त्यामुळे वैजापूर येथे केंद्र करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे सहकार आघाडीचे ज्ञानेश्वर जगताप, अभय पाटील चिकटगावकर, अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल, कैलास पवार, मोहन आहेर, मजीद कुरेशी, डॉ.राजीव डोंगरे, कचरु पाटील डिके, नारायण तुपे, दशरथ बनकर, दिनेश राजपूत, अनिल वाणी, महेश भालेराव, प्रभाकर गुंजाळ यांच्या शिष्टमंडळाने डॉ. कराड यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

वैजापूर शहराच्या बाहेरुन समृद्धी महामार्ग जात असून या महामार्गावर सध्या नागपूर ते मुंबई जोडणाऱ्या गॅस पाइपलाईनचे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत वैजापूर येथे गॅसचे केंद्र दिल्यास वैजापूर शहराला पाउपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होईल असे निवेदनात म्हंटले आहे.